Thu, Sep 24, 2020 16:40होमपेज › Kolhapur › कोल्हापूर रन रग्गेडियन अल्ट्रा मॅरेथॉन फेब्रुवारीत 

कोल्हापूर रन रग्गेडियन अल्ट्रा मॅरेथॉन फेब्रुवारीत 

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 21 2017 12:43AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

सुद‍ृढ आरोग्यासाठी आबालवृद्धांत धावण्याची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने रग्गेडियन क्‍लबच्या वतीने कोल्हापूर रन रग्गेडियन अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 11 फेब्रुवारी रोजी क्रीडानगरी कोल्हापुरात ही स्पर्धा रंगणार असून, यात जगभरातून स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे सहयोगी प्रायोजक दै. ‘पुढारी’ आहे.

कॉसमॉस बँक गोल्ड, फॉर्च्युन शहा ग्रुप, जे. के. ग्रोथ, कोरगावकर पेट्रोल पंप आदींच्या सहकार्याने होणार्‍या या स्पर्धेचे डिजिटल पार्टनर हॉट फ्रायडे टॉप्स हे आहेत. क्रीडा क्षेत्रात देशात आणि परदेशात कोल्हापूरचा नावलौकिक व्हावा, या उद्देशाने रग्गेडियन क्‍लबतर्फे क्रीडा आणि फिटनेस प्रमोशनसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. रग्गेड सह्याद्री सायकल रेस, रग्गेडियन शिवाजीराजे पन्हाळा-पावनखिंड ट्रेल रन, रग्गेडियन अ‍ॅब्स्टॅकल रेस पुणे यांचा समावेश आहे. 

मॅरेथॉनला वाढता प्रतिसाद...

फेब्रुवारी 2016 मध्ये घेण्यात आलेल्या रग्गेडियन मॅरेथॉन स्पर्धेत 2,500 स्पर्धक आणि फेब्रुवारी 2017 मधील स्पर्धेत तब्बल सहा हजार स्पर्धक सहभागी झाले होते. फेब्रुवारी 2018 मध्ये होणार्‍या स्पर्धेत 12 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील, असा संयोजकांचा अंदाज आहे. 

सात लाखांची पारितोषिके...

मुंबईनंतर महाराष्ट्रात सर्वात मोठी स्पर्धा कोल्हापुरात घेण्यात येत असून, शहरी भागात होणारी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा देशात केवळ कोल्हापुरात होते.  आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्‍या या स्पर्धेत संपूर्ण देशभरासह परदेशातील खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेत एकूण सात लाखांची पारितोषिक दिली जाणार आहेत. 

तीन हजार खेळाडूंची नोंदणी...

स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरू असून, आतापर्यंत तीन हजारांहून अधिक खेळाडूंची नोेंदणी झाली आहे. www.kolhapurrun.co  या संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. रग्गेडियन स्टोअर्स डी.वाय.पी. मॉल, तिसरा मजला, डी. टी. कारेकर सराफ, घाटी दरवाजा, महालक्ष्मी मंदिरसमोर,  रग्गेडियन ऑफिस, आमात्य टॉवर, चौथा मजला, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर आदी ठिकाणी नावनोंदणी अर्ज उपलब्ध आहेत. नावनोंदणीसाठी विविध सवलती देण्यात येणार आहेत. यामध्ये ग्रुप आणि कॉर्पोरेट नोंदणीस डिस्काऊंट दिला जाणार आहे. 

31 डिसेंबरपूर्वी नावनोंदणी करणार्‍या स्पर्धकांना त्यांचे नाव असणारे टी शर्ट दिले जाणार आहेत.  नोंदणी झाल्यानंतर स्पर्धकांना टी शर्ट, फिनिशियल मेडल, गुडी बॅग, रिफ्रेशमेंट, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अ‍ॅथलिट गाईड, टाईम चेक (पाच कि.मी. गट वगळून) देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेपूर्वी चार रविवारी होणार्‍या विविध कार्यक्रमांत या स्पर्धकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. नावनोंदणीचे अर्ज घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे. मॅरेथॉनसंदर्भातील अधिक माहितीसाठी 9623688883 किंवा 8806226600 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मॅरेथॉनसाठीचे विविध गट..

मॅरेथॉन 5 कि.मी., 10 कि.मी., 21 कि.मी., 42 कि.मी. आणि 50 कि.मी. अशा मुख्य 5 गटांत होणार आहे. याशिवाय 5 कि.मी. फन गट आणि  18 ते 35, 35 ते 50, 50 ते 65 आणि 65 वर्षांवरील यासह महिला व पुरुष गटात स्पर्धा होणार आहे. अपंगांसाठी स्वतंत्र गट असणार आहे.

स्पर्धेसाठी आयर्नमॅन पेसर...

स्पर्धकांना ठराविक अंतर अपेक्षित वेळेत पूर्ण करून देणारा निष्णात धावपटू म्हणजे पेसर होय. या स्पर्धेसाठी आयर्नमॅन हेच पेसर म्हणून कार्यरत राहणार आहेत. या स्पर्धेसाठी देशभरातील कानाकोपर्‍यातून तब्बल 20 आयर्नमॅन पेसर उपस्थित राहणार आहेत.