Wed, May 27, 2020 07:19होमपेज › Kolhapur › अबब..! ५० पर्यंत पाढे पाठ, तेही उलट-सुलट!

अबब..! ५० पर्यंत पाढे पाठ, तेही उलट-सुलट!

Last Updated: Mar 04 2020 9:24AM
हमीदवाडा (ता. कागल) : मधूकर भोसले

डिजिटल युगामध्ये सारेच आर्थिक व्यवहार कॅलक्युलेटरच्या सहाय्याने होत असतात. त्यामुळे गणिती प्रक्रिया करायची झाल्यास मोबाईल किंवा कॅल्क्युलेटरचा सर्रास वापर केला जातो. परंतु, हेच जर तोंडी प्रक्रिया केली तर? अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांकडून पाढे पाठांतर करून घेतले जातात. परंतु हेच पाढे विद्यार्थ्यांना ५० पर्यंत पाठ असतील तर? होय, हे खरं आहे. कागल तालुक्यातील चिकोत्रा खोर्‍यांमधील अर्जुनवाडा येथील जि. प. च्या प्राथमिक शाळेतील हुशार विद्यार्थ्यांनी ५० पर्यंतचे पाढे आणि तेही उलट-सुलट तोंड पाठ करण्याचा यशस्वी उपक्रम सुरू ठेवला आहे. 

डिजिटल युगामध्ये सारेच आर्थिक व्यवहार कॅलक्युलेटरच्या सहाय्याने होत असताना शाळांमधून पाढे पाठांतर हा उपक्रमच जणू हद्दपार होतो आहे. काही शाळांमध्ये जरी हा उपक्रम अस्तित्वात असला, तरी तो 30 पर्यंतच्या पाढ्यांपुरता असतो. मात्र, याही पुढे जात तब्बल 50 पर्यंतचे पाढे व तेही उलट-सुलट तोंडपाठ करण्याचा यशस्वी उपक्रम अर्जुनवाडा येथील जि.प.च्या प्राथमिक शाळेतील बहाद्दर विद्यार्थ्यांनी सुरू ठेवला आहे. विशेष म्हणजे, याला जोड पावकी, निमकी, अडीचकी या पाढ्यांचीदेखील आहे. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील अफलातून गुणवत्तेचा एक नमुना या शाळेने सिद्ध केला आहे. यामध्ये येथील शिक्षकांचे असणारे योगदानदेखील महत्त्वाचे आहे. 

या शाळेची स्थापना 1922 मध्ये झाली असून, चिकोत्राच्या अवर्षणग्रस्त अशा छोट्याशा गावातील या शाळेत मुली 73, तर मुले 70 असा एकूण 143 पट आहे. विशेष म्हणजे, या प्राथमिक शाळेला 8 वीचा वर्गदेखील जोडण्यात आला आहे. शाळेचा रोजचा परिपाठ अत्यंत प्रभावी व संगीतमय असतो. येथील मुख्याध्यापक व उपक्रमशील सामाजिक कार्यकर्ते टी. एस. गडकरी यांनी आपल्या सहकार्‍यांसोबत 
शाळेत विविध उपक्रम राबविले आहेत. गणित पक्के व्हावे व मुलांमध्ये आत्मविश्‍वास वृद्धिंगत व्हावा, या हेतूने त्यांनी मुलांना कौशल्याने 50 पर्यंतचे पाढे पाठ करणे शिकवले आहे. यासाठी ही मुले कोणताही स्वतंत्र वेळ काढत नाहीत. खेळताना, बागडताना, शाळेत येताना-जाताना असा जिथे वेळ मिळेल तिथे त्यांचे पाठांतर सुरू आहे. पहिली ते चौथीपर्यंत 30 पर्यंतचे पाढे मुलांना येतात. तर 5 वी ते 8 वीपर्यंत 50 पर्यंतचे पाढे उलट-सुलट पाठ आहेत. हे पाढे पाठांतर फक्‍त मोजक्याच मुलांना पाठ आहेत, असे नाही; तर अपवादात्मक मुले सोडली तर बहुतांशी सर्वच मुलांना ते पाठांतर आहेत. गणिते सोडविताना याचा आम्हाला खुप फायदा होतो असे या मुलांनी सांगितले. याबरोबरच अन्य उपक्रमांसाठी मुख्याध्यापकांबरोबरच एम. बी. तांबेकर, ग. ल. कुंभार, एन. एम. कांबळे, एम. आर. सुतार, आप्पासो वांगळे, पी. बी. मोरे व एस. एस. कुंभार या शिक्षकांचेही महत्वाचे सहकार्य आहे. त्याचबरोबर सरपंच प्रदीप पाटील व सदस्य तसेच शाळा समितीचे अध्यक्ष संजय सातवेकर व समिती सदस्य यांचे सातत्याने शाळेस प्रोत्साहन लाभत आहे. या शाळेने गेल्या दोन वर्षांपासून 3 ते 10 जानेवारी अखेर सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्र गाथेच्या पारायणाचा तसेच रंगपंचमीवेळी नैसर्गिक रंग तयार करून होळी खेळण्याचा उपक्रम देखील राबविला आहे.     

प्रामाणिकपणाची कार्यशाळा व गृह अभ्यासिका

शाळेमध्ये मुलांवर प्रामाणिकपणाचा संस्कार रुजावा, यासाठी विनाविक्रेता ग्राहक भांडार सुरू केले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याने स्वत:हून संबंधित वस्तूची किंमत तिथे ठेवून ती वस्तू घ्यायची असते. याबरोबरच शाळा सुटल्यानंतर घरी अभ्यास करण्यासाठी म्हणून प्रत्येक गल्‍लीला एक अशी गृह अभ्यासिका गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. यामध्ये शाळेत संबंधित गल्‍लीचे विद्यार्थी संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत अभ्यास करतात व त्यांच्यावर दररोज एका पालकाची समन्वयक म्हणून नियुक्‍ती आहे. याबरोबरच रोज परिपाठाला इंग्रजी शब्दसंग्रह वाढविण्यासाठी वर्ड विनर ही संकल्पना सुरू आहे. अशा विविध उपक्रमांनी या शाळेने आपली गुणवत्ता वाढविली आहे.