Sat, Apr 10, 2021 20:23
भाजपची सत्ता आली की मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देऊ

Last Updated: Feb 28 2021 1:32AM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले की, मराठा समाजाला आरक्षण देऊ. तेही कायदेशीरद़ृष्ट्या टिकणारे असेल, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

आ. पाटील म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारला गांभीर्य नाही. सरकारकडून वकिलांशी चर्चा केली जात नाही, त्यांना योग्य त्या सूचना दिल्या जात नाहीत. राज्य सरकारने मराठा आरक्षण प्रश्नी गांभीर्याने सामोरे जाणे गरजेचे आहे. आमच्या हाती काही जादूची कांडी नाही; पण योग्य अभ्यास करून टिकणारे आरक्षण देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.  

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे आणि  विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी या विषयावर बोलले पाहिजे. समाजाला उत्तर द्यावे, असे  पाटील यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. 

कोरोना कालावधीतील भ—ष्टाचाराचा पर्दाफाश करणार शेतकर्‍यांची कर्जमाफी, प्रामाणिक शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदान, वीज बिलाचा प्रश्न, पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई अशा विविध विषयांवर सभागृहात सरकारला घेरू, असेही पाटील म्हणाले. कोरोना महामारीच्या कालावधीत झालेल्या वैद्यकीय साहित्य खरेदीत प्रचंड भ—ष्टाचार झाला आहे. सभागृहात त्याचा पर्दाफाश करू’, असेही त्यांनी सांगितले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरणात भाजप तोंडघशी पडला, अशी टीका विरोधक करत आहेत. याकडे लक्ष वेधल्यावर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी ‘भाजपवर अशी टीका करणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे’, असा टोला  लगावला. पत्रकार परिषदेवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे (महानगर), विजय अग्रवाल उपस्थित होते.

पेट्रोलवरील वाढीव कर कमी करण्यासाठी आंदोलन करणार 

देशातील इतर राज्यांत पेट्रोल दर कमी आहेत. महाराष्ट्रात राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलवर लावलेले  कर जास्त आहेत. त्यामुळे राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले आहेत. राज्य सरकारने इंधनावरील कर कमी केल्यास दरही कमी होतील.  सरकारने इंधनावरील कर कमी करावेत, या मागणीसाठी आंदोलन करणार,  असेही त्यांनी सांगितले.  

राठोडांचा राजीनामा घ्या; अन्यथा सभागृह चालवू देणार नाही 

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा सोमवार, दि. 1 मार्चपर्यंत राजीनामा घ्यावा; अन्यथा विधिमंडळाच्या सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही. संपूर्ण राज्यभर आंदोलनाचे रान उठवू, असा इशारा  आ. पाटील यांनी दिला आहे. स्वत:ला सत्यवादी समजणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार याप्रकरणी आतापर्यंत गप्प का बसलेत? असा सवालही आ. पाटील यांनी उपस्थित केला. चव्हाण या मूळच्या बीडच्या असताना त्यांचा यवतमाळमध्ये गर्भपात कसा? घटना घडली त्यावेळी उपस्थित असणारे ते दोघे कुठे गायब झाले आहेत? कुणाच्या सांगण्यावरून गायब झाले? डॉ. रोहिदास चव्हाण कुठे आहेत? पोस्टमार्टम अहवाल कुठे आहे? या सार्‍याचा राज्य सरकारने उलगडा करावा, अशी मागणी पाटील यांनी केली.