Tue, Aug 04, 2020 13:45होमपेज › Kolhapur › इचलकरंजी उद्यापासून नियम अटींसह सुरू होणार

इचलकरंजी उद्यापासून नियम अटींसह सुरू होणार

Last Updated: Jul 14 2020 1:19PM
इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत इचलकरंजी शहर बुधवार १५ जुलैपासून पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय शहर संनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे गेल्या सात दिवसांपासून बंद असलेले इचलकरंजी शहरातील सर्व व्यवहार बुधवारपासून पुन्हा सुरू होण्याचा मार्ग रिकामा झाला आहे. विशेष म्हणजे शासनाने मान्यता दिलेल्या सर्व आस्थापनांची वेळ दोन तास वाढवल्यामुळे सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत ती सुरू राहणार आहेत.

अधिक वाचा : कोल्हापूर : हुपरीतील कोरोना पॉझिटिव्ह 'त्या' वृद्ध महिलेचा मृत्यू 

इचलकरंजी शहरातील वाढत्या कोरोनो रूग्णांची संख्या लक्षात घेता इचलकरंजी शहर ६ ते १४ जुलैपर्यत १०० टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. १४ जुलैनंतर शहरातील लॉकडाऊन हटवणार की वाढवणार याकडे इचलकरंजीकरांचे लक्ष लागून राहिले होते. यावर निर्णय घेण्यासाठी आज नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शहर संनियंत्रण समितीची बैठक आयोजित केलेली होती.

अधिक वाचा :  शाळकरी मुलीवर अत्याचार; सहा संशयितांना अटक

यावेळी उपस्थितांनी कोरोनोचा संसर्ग टाळणे आणि वस्त्रोद्योग पूर्वपदावर कसा येईल यावर मते व्यक्त केली. सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर १५ जूलैपासून शहर पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार ठरलेल्या वेळेत शहरातील आस्थापना आणि इतर व्यवहार सुरू ठेवण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. यामध्ये कारखाने, उद्योग, सर्व प्रकारचे यंत्रमाग, गारमेंट व इतर औद्योगिक आस्थापनांना समावेश आहे. कंन्टमेंट झोनमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर उद्योग व्यवसाय मात्र बंदच राहणार आहेत. शहरातील सर्व व्यावसायिकांनी त्यांच्याकडे काम करणार्‍या कामगारांची सर्व माहिती अक्षम अधिकार्‍यांकडे देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. कामगारांना दर दोन तासानंतर हात धुण्यांसाठी 5 मिनिटांचा ब्रेक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.  

अधिक वाचा : कोल्हापूर : वृद्ध दाम्पत्याची पेटवून घेऊन आत्महत्या

विशेष म्हणजे  गुंडी-बंडी कामगारांची संपूर्ण माहिती यंत्रमागधारकांना ठेवावी लागणार आहे. कामगारांची वैद्यकीय तपासणी दैनंदिन स्वरुपात करणे व त्याबाबतचा नोंदी लेखी स्वरुपात ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. व्यवसायच्या ठिकाणी गर्दी केल्यास संबंधितविरुद्ध दंड, गुन्हा, तसेच आस्थापना काही दिवसासाठी सील करणे अशा स्वरूपाची कार्यवाही करण्यात येणार आहे.

या बैठकीस खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, उपविभागीय अधिकारी विकास खरात, अशोकराव जांभळे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिराजदार, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, नगरसेवक अजित जाधव, मदन कारंडे, सागर चाळके, शशांक बावचकर, सुनील पाटील, प्रकाश मोरबाळे, रवींद्र माने, राहुल खंजीरे, मदन झोरे, संजय कांबळे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार आदींनी सहभाग घेतला.

किराणा दुकान, औषधालये, हॉस्पिटल, भाजीपाला, बँका इत्यादी सेवा नेमून दिलेल्या वेळेतच सुरू राहणार आहेत. भाजीपाला व फळ विक्रेते यांनी फिरत्या स्वरूपामध्ये सकाळी ८ ते २ या वेळेतच त्यांना नेमून दिलेल्या परिसरातच करावयाचे आहे. कोणीही सर्व रस्ता, चौक तसेच नेहमीच्या बाजारच्या ठिकाणी किंवा एका ठिकाणी थांबून व्यवसाय करावयाचा नाही. तसे आढळून आल्यास संबधिताविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करुण गुन्हे दाखल करणेत येतील. तसेच परवाना रद्द करुण नगरपालिका हद्दीतील व्यवसाय करणेस प्रतिबंध करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.