Fri, Sep 25, 2020 13:19होमपेज › Kolhapur › काँग्रेस नगरसेवकांचा आवाडे पिता-पुत्रांना धक्‍का

काँग्रेस नगरसेवकांचा आवाडे पिता-पुत्रांना धक्‍का

Published On: Sep 06 2019 1:43AM | Last Updated: Sep 05 2019 11:47PM
इचलकरंजी : प्रतिनिधी 

विद्यमान आमदारांनी विकासकामांचा खेळखंडोबा केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला यावेळी मोठी संधी होती. मात्र, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सर्वांनाच अडचणीत आणले. 370 कलमाचे निमित्त पुढे करून त्यांनी सोडचिठ्ठी दिली असली तरी काही दिवसांपूर्वी आमदारांनी वापरलेली दहशतीची भाषा, चौकशी लावण्याचे दिलेले संकेत याच्याशी सोडचिठ्ठीचा काही संबंध आहे का, हे तपासणे गरजेचे असल्याचे मत काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केले. यापुढे काँग्रेस पक्षात एकाधिकारशाही असणार नाही. काँग्रेसचे पालिकेतील सर्व 19 नगरसेवक काँग्रेससोबत असून विधानसभेला ज्यांना तिकीट मिळेल त्याचा एकदिलाने प्रचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी खासदार कल्‍लाप्पाण्णा आवाडे व माजीमंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले होते. या पार्श्‍वभूमीवर आज पालिकेतील काँग्रेस नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीस 17 नगरसेवक उपस्थित होते. या सर्व नगरसेवकांनी काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज प्रमुख नगरसेवकांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष व नगरसेवक संजय कांबळे म्हणाले, माजी मंत्री आवाडे यांचा काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय धक्‍कादायक आहे. काँग्रेसमधून निवडून आलेले सर्वच नगरसेवक यापुढे काँग्रेसचे काम करणार आहेत.  

नगरसेवक राहुल खंजिरे म्हणाले, 40 वर्षे काँग्रेसने आवाडे यांना अनेक पदे दिली. मात्र, पक्षाच्या भूमिकेवर तोफ डागत आवाडेंनी काँग्रेसशी फारकत घेणे चुकीचे आहे. शहराच्या विकासासाठी दे.भ.बाबासाहेब खंजिरे, दत्ताजीराव कदम, सुभेदार काका, मल्हारपंत बावचकर, अनंतराव भिडे, सदाशिवराव मुरदंडे आदींसह अनेकांनी काँग्रेसचा विचार रुजवला. त्यामुळे आवाडे यांच्या जाण्याने काँग्रेसचे कार्यकर्ते पोरके होणार नाहीत.  बावचकर म्हणाले, काँग्रेस पक्षाने आवाडे पिता-पुत्रांना सर्व प्रकारची संधी दिली आहे. 1978 ते 2014 पर्यंत सातत्याने आवाडे घराण्याला काँग्रेसने उमेदवारी दिली. 1952 नंतर दे. भ. खंजिरे यांच्यासह अनेकांनी इचलकरंजी व परिसर काँग्रेसचा बालेकिल्‍ला म्हणून नावारूपास आणला. अनेक ज्येष्ठ नेते पक्षात काम करीत असताना 1985 मध्ये नवख्या प्रकाश आवाडे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. मात्र, सर्वांनी एकदिलाने त्यांना निवडून आणले. जिल्हाध्यक्ष निवडणुकीचा अपवाद वगळता काँग्रेस पक्षाने आवाडेंना सर्व संधी दिल्यामुळे नाराजीचा प्रश्‍नच उद्भवत नाही.  नगरसेवक हा महत्त्वाचा घटक असून त्यांना अंधारात ठेवून निर्णय घेण्याच्या प्रवृत्तीला सर्वांचा विरोध असल्याचे स्पष्ट करीत पालिकेतील 19 नगरसेवक काँग्रेस पक्षासोबत राहून पक्षाच्या बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे बावचकर यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील व माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्याशी संपर्क साधला असून काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही बावचकर यांनी सांगितले. पत्रकार बैठकीस नगरसेवक राजू बोंद्रे, पै. अमृत भोसले आदी उपस्थित होते. 

इचलकरंजीचे काँग्रेस पक्षाध्यक्षपद रिक्‍त 

पक्षातील आवाडेंचे काम गेल्या काही दिवसांपासून संथगतीने सुरू होते. त्यामुळे त्यांचा राजीनाम्याचा निर्णय अनपेक्षित नाही. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी शहराध्यक्षपदी प्रकाश दत्तवाडे आणि कार्याध्यक्षपदी संजय कांबळे यांची गंमत म्हणून निवड केली का, ही राजकीय संस्कृती आहे का, असे सवालही बावचकर यांनी यावेळी उपस्थित केले. काँग्रेसला भविष्यात चांगले दिवस येतील, असा विश्‍वासही  त्यांनी व्यक्‍त केला. शहराध्यक्ष प्रकाश दत्तवाडे आवाडेंच्या मेळाव्याला उपस्थित होते. त्यामुळे यापुढे दत्तवाडे शहराध्यक्ष म्हणून राहू शकणार नाहीत, असेही बावचकर यांनी सांगितले.