Thu, Sep 24, 2020 07:29होमपेज › Kolhapur › होय..! मी काँग्रेसवर नाराजच : पी. एन. पाटील

होय..! मी काँग्रेसवर नाराजच : पी. एन. पाटील

Last Updated: Jan 02 2020 1:53AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

होय..! मी काँग्रेस पक्षावर नाराज आहे. 40 वर्षे पक्षासोबत प्रामाणिक राहून काय फळ मिळाले? अजून पक्षासाठी काय करणे अपेक्षित आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार पी. एन. पाटील यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संकेत देत पी. एन. पाटील यांनी सस्पेन्स कायम ठेवला.

भूकंपाचे संकेत
राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या पी. एन. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी फुलेवाडी येथे मेळावा घेऊन काँग्रेसच्या पदांचा राजीनामा दिला होता. पी. एन. पाटील यांनीही ठोस भूमिका घेऊन काँग्रेसमधून बाहेर पडावे, यासाठी कार्यकर्त्यांने एक शिष्टमंडळ त्यांना भेटणार होते. या पार्श्‍वभूमीवर पी. एन. पाटील यांनी पक्षावर नाराज असल्याचे स्पष्ट करीत राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले.

पी. एन. पाटील म्हणाले, राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून केली. पडत्या काळात पक्षासोबत प्रामाणिक राहिलो. मात्र, आता कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे. आजच्या मेळाव्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठक घेण्यासाठी विनंती केली आहे. अजून चर्चा झाली नाही. दोन दिवसांत प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ.

पी. एन. पाटील कोणती भूमिका घेणार यावर जिल्हा परिषदेतील सत्तेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात गोकुळची निवडणूक होत आहे. महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील हेच एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. पी. एन. यांच्या नाराजीमुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगाला खो बसू शकतो.

 "