Sat, Feb 29, 2020 12:21होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या आर्द्रतेत प्रदूषणकारी घटक

कोल्हापूरच्या आर्द्रतेत प्रदूषणकारी घटक

Published On: Jan 06 2018 1:22AM | Last Updated: Jan 05 2018 11:47PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : विजय पाटील 

सध्या थंडीचेच दिवस आहेत; पण या थंडीमुळे आर्द्रताही वाढली आहे. त्यामुळे धुक्याची दुलई बहुतेक ठिकाणी दाटून असते. ऊसतोडणीनंतर फड पेटवण्याचे प्रकार, तसेच वाहनांच्या धुराचा परिणाम म्हणून या धुक्यामध्ये धूर आणि धुलिकण मिसळत आहेत. यामुळे शहरासह बहुतेक भागात या नैसर्गिक धुक्याचा प्रदूषणकारी धुराडा होत आहे. हा धुराडा आरोग्याला हानिकारक असल्याने चिंताजनक आहे. वातावरणातील बदलामुळेही यामध्ये वाढ होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. 

सध्या थंडीचे आल्हाददायक वातावरणाचे दिवस आहेत. थंडीचे दिवस हे आरोग्यासाठी पोषक मानले जातात; पण यंदाच्या थंडीत आर्द्रता नेहमीप्रमाणे असली, तरी त्यामध्ये प्रदूषणाचे घटक समाविष्ट आहेत. त्यामुळे श्‍वसनाचे रोग, खोकला आदी आजारांना आमंत्रण मिळत असल्याचे दिसत आहे. तरी यावर्षी समुद्रातील वादळांमुळे थंडी उशिरा पडली आहे. या थंडीत दररोज किंचित वाढ होत आहे.

कारण, तापमान कमी होऊ लागले आहे. सध्या शहरात किमान 10 अंश सेल्सिअस आणि कमाल 31 सेल्सिअस तापमानाची नोंद शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागात झाली आहे. 28 डिसेंबर 2017 ते 1 जानेवारी 2018 या कालावधीतील सरासरी तापमान 19 अंश सेल्सिअस इतके नोंद आहे. यासह हवेतील आर्द्रता किमान 29 आणि कमाल 83 अंश इतके नोंद आहे. जितकी थंडी जास्त तितकी आर्द्रता जास्त असते.

त्यामुळे रात्री आणि पहाटे आर्द्रतेचे प्रमाण जास्त दिसते. आर्द्रता जास्त असण्याचा परिणाम धुक्यात होतो. त्यामुळे पहाटे अनेक भागात धुके दिसून येते. धुके ही नैसर्गिक प्रक्रिया आहे; पण जर प्रदूषणाची मात्रा जास्त असेल, तर धुक्याचे रूपांतर धुराडीत होतो. हा धुराडा आरोग्याला अत्यंत हानिकारक आहे. सध्या शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात धुराड्याचे प्रमाण वाढत आहे. याचे कारण  वाहनांतून निघणारा धूर, तसेच ऊसतोडणीनंतर पेटवले जाणारे फड हे प्रमुख घटक आहेत.