होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा रामभरोसे!

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा रामभरोसे!

Published On: Jul 10 2019 1:39AM | Last Updated: Jul 10 2019 1:39AM
कोल्हापूर : विकास कांबळे

सध्या कोल्हापूर शहरात काही ठिकाणी साथीने थैमान घातले असतानाही जिल्ह्यातील आरोग्य उपसंचालक व सहायक संचालक हिवताप ही चार जिल्ह्यांसाठी असणारी पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्‍त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बेभरवशाची बनली आहे. 

विभागीय आरोग्य उपसंचालक नसल्यामुळे सुमारे दोनशे कर्मचार्‍यांच्या बदल्या रद्द झाल्याचे समजते. त्यामुळे कर्मचार्‍यांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे. चार जिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आरोग्य उपसंचालकांवर असते. तत्कालीन उपसंचालक डॉ. पी. पी. धारूरकर मे महिन्यामध्ये सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून ही जागा रिक्‍त आहे. त्याचा कार्यभार कोल्हापुरातील कोणत्याही अधिकार्‍यांकडे न देता पुण्यातील डॉ. नितीन बिलोलीकर यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यामुळे ते इकडे येण्याऐवजी तेथूनच कारभार पाहू लागले. 

सध्या पंढरपूरची वारी सुरू असल्यामुळे बहुतांशी आरोग्य अधिकारी या कामामध्ये गुंतले आहेत. त्यामुळे ही यात्रा संपेपर्यंत या कार्यालयाकडे लक्ष देण्यास अधिकार्‍यांना वेळ मिळणे अवघड आहे. त्याचा परिणाम येथील कामावर झाला आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील आरोग्याची संपूर्ण माहिती राज्याला कळविण्याचे काम आरोग्य उपसंचालकांकडून केले जाते. त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी साथीचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्यावर देखील आरोग्याची अन्य यंत्रणांना सोबत घेऊन नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी या कार्यालयाची असते.  या चार जिल्ह्यांत समन्वय राखण्याचे काम आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत केले जाते. अधिकारी याठिकाणी नसल्यामुळे हे काम विस्कळीत झाले आहे.

या कार्यालयाच्या वतीने चार जिल्ह्यांतील कर्मचार्‍यांची अस्थापना देखील पाहिली जाते. शासन निर्णयानुसार मे अखेर बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, बदल्यांचे प्रस्ताव उशिरा सादर करण्यात आल्याने सुमारे दीडशे ते पावणेदोनशे कर्मचार्‍यांच्या बदल्या रद्द झाल्याने त्यांची गैरसोय झाली आहे. आरोग्य आयुक्‍त कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे प्रस्ताव सादर केले आणि आरोग्य आयुक्‍त रजेवर गेले. त्या काळातील त्यांचा कार्यभार तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांच्यापुढे संबंधितांनी जाण्याचे टाळल्याने या बदल्यांना उशीर झाल्यामुळे या बदल्याच रद्द झाल्या आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे.

रिक्‍त पदे भरण्याची मागणी
आरोग्य विभागातील सहसंचालक हिवताप हे पद देखील रिक्‍त आहे. या कार्यालयांतर्गत कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे चार जिल्हे येतात. येथील सहसंचालक डॉ. जी. जी. शिंदे निवृत्त झाल्यापासून अद्याप हे पद भरलेले नाही. या कार्यालयाकडून डेंग्यू, चिकुन गुनिया, लेप्टोस्पायरोसिस, मलेरियासारख्या साथीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या डेंग्यूच्या साथीने कोल्हापुरात थैमान घातले असतानाही या कार्यालयाचा कार्यभार अधिकार्‍याविनाच सुरू आहे. ही पदे त्वरित भरावीत, अशी मागणी होत आहे.