Thu, Sep 24, 2020 08:18होमपेज › Kolhapur › हातकणंगले पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतच लढत

हातकणंगले पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतच लढत

Published On: Sep 28 2019 1:21AM | Last Updated: Sep 27 2019 9:18PM
हातकणंगले  : उमेश घोरपडे

हातकणंगले या राखीव मतदार संघात यंदाही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतच लढत रंगणार, असे वातावरण आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. सुजित मिणचेकर विजयाची हॅट्ट्रिक साधणार, की बदलत्या राजकीय समीकरणांमुळे मतदार संघाला नवीन आमदार मिळणार, याची उत्सुकता आहे. यंदाची लढत बहुरंगी होणार, असा अंदाज असला तरी गत निवडणुकीतील सेना व काँग्रेस यांच्यातील दुरंगी लढतीचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. 

2009 च्या निवडणुकीत डॉ.सुजित मिणचेकर यांनी सेनेची उमेदवारी मिळवतानाच जनसुराज्यच्या राजीव आवळे यांना धोबीपछाड दिला. डॉ.मिणचेकर यांनी पुढील निवडणुकीची सुरुवातीपासूनच मोर्चेबांधणी करत मतदार संघात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. जनसुराज्यचे तत्कालीन आमदार राजीव आवळे व काँग्रेसचे उमेदवार राजूबाबा आवळे हे मतदार संघाबाहेरील असल्याचा प्रचार डॉ. मिणचेकर यांनी पद्धतशीरपणे केला. त्याचा व मोदी लाटेचा फायदा डॉ. मिणचेकर यांना 2014 मध्ये झाला व मतदार संघात पुन्हा भगवा फडकला.  

आता 2019 च्या निवडणुकीत मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. डॉ. मिणचेकर यांना स्वपक्षीयातूनच विरोधाला सामोरे जावे लागत आहे. यातूनच मतदार संघातील ज्येष्ठ शिवसैनिक आकाराम दबडे यांचे पुत्र संदीप दबडे यांच्या उमेदवारीसाठी सेनेतून जोर वाढला आहे. त्यामुळे सेनेची उमेदवारी पुन्हा मिळवण्याचे व नंतर विरोधकांशी दोन हात करण्याचे आव्हान डॉ. मिणचेकर यांच्यापुढे आहे. याशिवाय सत्तारूढ म्हणून असलेली नाराजीही त्यांच्यापुढे असणार आहे. 

काँग्रेस व राष्ट्रवादीची युती झाली आहे. हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून पुन्हा राजूबाबा आवळे यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत असली, तरी या मतदार संघावर मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दावा केला आहे. शेतकरी संघटनेने वैभव कांबळे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. 

हातकणंगले मतदारसंघ मिळाला नाही, तर राजूबाबा आवळे यांनीच संघटनेमार्फत लढावे, असाही प्रस्ताव ठेवल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला असून, राजूबाबा आवळे यांना काँग्रेसकडूनच लढताना स्वाभिमानीची प्रामाणिकपणे मदत होईल, यासाठी कसरत करावी लागणार आहे. 

तिसरे प्रतिस्पर्धी राजीव आवळे जनसुराज्यकडून पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. जनसुराज्य भाजपचा घटकपक्ष आहे. त्यामुळे मतदार संघात जनसुराज्यची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे जनसुराज्यच्या उमेदवारीचे घोंगडे भिजत असले, तरी राजीव आवळे यांच्याशिवाय डॉ.अविनाश सावर्डेकर यांनी जनसुराज्यच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. शिवाय अशोक माने यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे जनसुराज्यच्या उमेदवारीसाठी चुरस असून जनसुराज्यकडून उमेदवारी न मिळाल्यास राजीव आवळे बहुजन वंचित आघाडीच्या चिन्हावर लढू शकतात, असा एक तर्क आहे. 
या मतदार संघावर प्रकाश आवाडे गटाचाही प्रभाव आहे.

आवाडे यांनी हातकणंगलेमध्ये गटाचा आमदार असेल, असे सूतोवाच करून एकप्रकारे निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. माजी समाजकल्याण सभापती किरण कांबळे रिंगणात असण्याची चिन्हे आहेत. आवाडे यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याने काँग्रेसला फटका बसला आहे. एकंदरीत निवडणूक यंदा बहुरंगी होणार, अशी चिन्हे असली तरी सेना व काँग्रेस असाच गत निवडणुकीतील दुरंगी लढतीचा प्रत्यय यंदाच्या निवडणुकीतही येण्याची चिन्हे आहेत.


द़ृष्टिक्षेप विधानसभा निवडणूक 2014
 

डॉ. सुजित मिणचेकर   शिवसेना       मते- 89087
जयवंतराव आवळे         काँग्रेस          मते - 59717
राजीव आवळे            जनसुराज्य     मते - 32874
प्रमोद कदम               स्वाभिमानी     मते - 21318

द़ृष्टिक्षेप लोकसभा निवडणूक 2019
धैर्यशील माने     शिवसेना             मते - 5,85,776
राजू शेट्टी            स्वाभिमानी         मते - 4,89,737