Sun, Sep 27, 2020 00:16होमपेज › Kolhapur › गुळाची 92 हजार क्‍विंटल आवक घटली

गुळाची 92 हजार क्‍विंटल आवक घटली

Last Updated: Jan 21 2020 10:26PM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर गुळाची प्रमुख बाजारपेठ; मात्र कोल्हापूर शेती उत्पन्‍न बाजार समितीत गुळाची आवक घटली असून, गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 92 हजार 172 क्‍विंटल आवक घटली आहे. दरामध्येही तफावत राहिली आहे. जानेवारीअखेरपर्यंत 1 लाख क्‍विंटलहून अधिक आवक घटण्याची शक्यता आहे. याचा बाजारपेठेच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होताना जाणवत आहे.

यंदा जुले, ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या बहुतांशी भागात महापूर आला. त्यामुळे ऊस पिकाचे नुकसान झाले. नदीकाठावरील गुर्‍हाळघरांची पडझड झाली. परिणामी, यावर्षी गुर्‍हाळघरांची संख्या घटली. तसेच गेल्या काही वर्षांत गुळाच्या दरात होत असलेली घसरण, मजूरटंचाई, पायाभूत सुविधांचा अभाव आदी समस्यांचा सामनाही गूळ उद्योगाला करावा लागत आहे. त्याचा परिणाम यावर्षी गूळ आवकेवर होत आहे. यावर्षी हंगामाच्या प्रारंभापासूनच गूळ आवक कमी राहिली आहे.

ऑक्टोबर महिन्यापासून यावर्षीच्या गूळ हंगामाला प्रारंभ झाला. ऑक्टोबर    महिन्यात 61 हजार 225 रव्यांची आवक झाली. नोव्हेंबर महिन्यात 3 लाख 25 हजार 517 रव्यांची, तर डिसेंबर महिन्यात 4 लाख 31 हजार 413 रव्यांची आवक झाली. जानेवारी महिन्यात 17 जानेवारीअखेर 2 लाख 6 हजार 806 रव्यांची आवक समितीत झाली. 2019-20 हंगामात 3 लाख 28 हजार 87 क्‍विंटल आवक झाली. गतवर्षीच्या हंगामात (2018-19 सालातील) बाजार समितीत 17 जानेवारीपर्यत 4 लाख 20 हजार 262 क्‍विंटल  आवक होती. 

दरामध्येही गतवर्षीपेक्षा यंदा थोडीफार तफावत आहे. गतवर्षी गुळाला प्रतिक्‍विंटलला किमान 2 हजार 500 ते कमाल 6 हजार  रुपये इतका दर मिळाला. सरासरी दर 3 हजार 300  रुपये इतका राहीला. यावर्षीच्या हंगामात किमान दरात थोडीफार वाढ झालेली आहे. किमान दर 2 हजार 800 रुपये राहीला आहे व कमाल दर 5 हजार 800 रुपये मिळाला आहे. सरासरी दर 3 हजार 200 ते 3 हजार 300 रुपये इतका राहीला आहे. गतवर्षी 17 जानेवारीपर्यत 138 कोटी 68 लाख रुपयांची गुळ विभागात उलाढाल झाली होती. यंदा हीच उलाढाल 105 कोटी रुपयांच्या आसपास आहे यामुळे उलाढालीतही 33 कोटीहून अधिक रुपयांची घट झाली आहे. यावर्षी उसाच्या कमतरतेमुळे हंगाम लवकर  संपुष्टात येण्याची शक्यता असून आवक व उलाढालीत यंदा आणखी घट होण्याची शक्यता गुळामधील तज्ञाकडून वर्तविण्यात येत आहे.
 
 

 "