Tue, Jul 14, 2020 07:48होमपेज › Kolhapur › पालकमंत्र्यांच्या गुगलीने काँग्रेसला धक्‍का

पालकमंत्र्यांच्या गुगलीने काँग्रेसला धक्‍का

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 05 2018 11:58PMकोल्हापूर : विकास कांबळे

विधानसभा निवडणुकीचे वातावरण पावसाळ्यातच तापण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूर उत्तरमधून शिवसेनेच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असणार्‍यांच्या नावांच्या यादीत रोज एक नवीन नाव वाढतच आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांचे नाव चर्चेत असल्याचे सांगितले; पण पक्षाने आदेश दिल्यास आपणही लढण्यास तयार असल्याचे सांगून त्यांनी इच्छुकांना सावधानतेचा इशारा दिल्याचे मानले जाते. पालकमंत्र्यांनी इच्छुकांची नावेच जाहीर केल्याने आणि त्यात काँग्रेस संबंधितांची नावे असल्याने काँग्रेसला धक्‍का बसल्याचे मानले जात आहे.

विधानसभेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी त्याची तयारी सुरू केली आहे. ज्याठिकाणी काटाजोड लढती होण्याची शक्यता आहे, त्या विधानसभा मतदारसंघात आतापासूनच जुगलबंदी सुरू झाल्या आहेत. आव्हान, प्रतिआव्हान जोरात सुरू आहे. त्याला कोल्हापूर उत्तरचा मतदारसंघही अपवाद नाही. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर प्रतिनिधीत्व करत आहेत. गेल्या दोन्ही निवडणुकीत त्यांना कसबा बावड्यातून चांगलीच रसद पुरविण्यात आली आहे. यावेळी मात्र ही रसद मिळण्याची शक्यता कमी आहे. राज्यात भाजप व शिवसेना एकत्र सत्तेत आहे; पण त्यांचे पटत नाही तशीच परिस्थिती कोल्हापुरात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे आमदार क्षीरसागर यांच्यातील संबंध सर्वश्रुत आहेत. दोघांनी एकमेकांवर टोकाची टीका केली आहे. अजूनही त्यात फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांच्या गेल्या दोन वर्षांतील हालचाली पाहता त्यांनी कोल्हापूर उत्तरवर चांगलेच लक्ष केंद्रीत केले असल्याचे दिसते. मात्र, त्यांनी आपल्या उमेदवारीबाबत कधी भाष्य केले नव्हते.

गेल्या निवडणुकीत भाजप व सेना स्वतंत्रपणे लढल्या होते. शिवसेनेने ही जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळविले असले तरी यात भाजपच्या उमेदवाराने देखील लक्षणीय मते घेतली होती. निवडणुकीनंतर कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्रिपद मिळाले. शिवाय राज्यातील वजनदार मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. त्यामुळे भाजपकडे काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वळू लागले. गेल्यावेळी भाजपच्या विरोधात निवडणूक लढविणारेही सध्या त्यांच्या गाडीतून हातात कमळ घेऊन फिरत आहेत. याशिवाय इच्छुकांची गर्दी त्यांच्याकडे दिसत असल्याने कोल्हापूर उत्तरमधील आपली ताकद वाढल्याचा भास भाजपच्या नेत्यांना होऊ लागला आहे. अर्थात ही सगळी त्यांची गणितं जर-तर वर अवलंबून आहेत. कोल्हापूर उत्तरमधून सर्वांच्या नजरा आहेत त्या आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्यावर. ऋतुराज यांचे चुलते आमदार पाटील यांनी गेल्या वाढदिवसापासूनच आपल्या पुतण्याचे लाँचिंग करण्यास सुरुवात केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे देखील नाव भाजपच्या व्यासपीठावरून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्‍यांच्या यादीत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजकारणाची चर्चा सुरू झाली 
आहे.  

एकेकाळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्‍ला मानला जायचा; पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. मोदी लाटेने राजकारणाची सर्व समीकरणे बदलून टाकली आहेत. बारापैकी दहा-अकरा आमदार काँग्रेसचे असायचे, आता विधानसभेत एकही काँग्रेसचा आमदार नाही, अशी काँग्रेसची अवस्था आहे. तरीही नेत्यांच्या गाड्यांच्या काचा अजूनही वरच आहेत. कोल्हापूर शहर आणि सध्याचा उत्तर मतदारसंघ आतापर्यंतच्या  एक, दोन वेळच्या निवडणुकांचा अपवाद सोडल्यास कायम काँग्रेस विरोधक निवडून आले आहेत. सध्याची उत्तरची परिस्थिती पाहता तर काँग्रेसवर उमेदवार शोधण्याची वेळ येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची कोल्हापूर उत्तरमधील ताकद विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाली आहे. याचा फायदा भाजप उचलण्याचा प्रयत्न करत असून आतापासूनच त्यांनी वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे.