Sat, Oct 24, 2020 23:09



होमपेज › Kolhapur › पालकमंत्री सतेज पाटलांचा तलाठी, ग्रामसेवकांना सज्जड दम

'पंचनाम्यातून नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार'

Last Updated: Oct 18 2020 8:02PM

पालकमंत्री सतेज पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी आपली व्यथा मांडताना शेतकरी महिला



कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेती क्षेत्राचे पंचनामे ग्रामसेवक आणि तलाठी यांनी करावेत. याचबरोबर पंचनाम्यात कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. पंचनाम्यातून शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार असतील. याबाबतचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी काढावेत, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (दि.१८) दिली. शेतकऱ्यांनीही गट विकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी पंचनाम्याबाबत संपर्क साधावा, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये सुरु असणारे पंचनामे ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा. तसेच पंचनाम्यातुन कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता ग्रामसेवक, तलाठी यांनी घ्यावी. त्यांच्यावर मोठी जबाबदारी राहील, तसे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी काढावेत. पंचनाम्यासाठी ज्या गावात जाणार आहेत, त्याबाबत ग्रामस्थांना अदल्यादिवशी गावांमध्ये दवंडी देवून कळवावे. शेतकऱ्यांनी पंचनाम्याबाबत तहसिलदार, गट विकास अधिकारी यांना संपर्क करुन सहकार्य करावे. राज्य शासन तत्परतेने गांभीर्यपूर्वक भरपाई देण्यासाठी पावले उचलत असून लवकरात लवकर मदत दिली जाईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली.  

वादळीवारे, अतिवृष्टीमुळे शेतात पडलेला ऊस गाळपाला आधी गेला पाहिजे त्याबाबतची यादी कृषी विभागाने तयार करुन तसे पत्रही पाठवावे, असेही पालकमंत्री म्हणाले.  किणी, कोवाड येथील भात पिकाचे नुकसान झालेल्या रुक्मिणी गोविंद गिरी या शेतकरी महिलेच्या शेत पिकाचे नुकसान पाहून पालकमंत्री पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. 

पालकमंत्री पाटील यांनी चंदगड तालुक्यातील दुंडगे, कुदनूर, काळकुंद्री, हुदळेवाडी, किणी, कोवाड आणि निट्टूर या गावातील अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार राजेश पाटील उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन कोवाड येथे बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी जिल्ह्यातील शेत पिकांचे नुकसान,  सुरु असणारे पंचनामे याबाबत सविस्तर माहिती दिली. 

दुंडगे, कुदनूर पुलाबाबत लवकरच बैठक

दुंडगे, कुदनूर गावांना जोडणाऱ्या पुलाची पाहणीही पालकमंत्र्यांनी आज केली. या पुलाला संरक्षित कठडा नसल्याने हा पूल धोकादायक होत आहे. या पुलावरुन व्यक्ती वाहून जाण्याच्या घडलेल्या घटनेची माहिती आमदार राजेश पाटील आणि ग्रामस्थांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली. या पुलाबाबत लवकरच बैठक घेवून, हा‍ पूल ग्रामस्थांसाठी सुरक्षित केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगन, अरुण सुतार, गडहिंग्लजचे पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे, दुंडगेचे सरपंच राजेंद्र पाटील, तहसिलदार विनोद रणावरे, गट विकास अधिकारी चंद्रकांत बोदरे , उप विभागीय कृषी अधिकारी नंदकुमार कदम आदींसह या परिसरातील अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
 





 







"