Sun, Jul 05, 2020 15:49होमपेज › Kolhapur › हजारांवर ग्रा.पं. सदस्य रडारवर

हजारांवर ग्रा.पं. सदस्य रडारवर

Published On: Dec 15 2018 1:06AM | Last Updated: Dec 14 2018 11:20PM
कोल्हापूर : अनिल देशमुख

मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत जिल्ह्यातील हजारांवर ग्रामपंचायत सदस्य रडारवर आहेत. राखीव प्रवर्गातून विजयी झालेल्या 3 हजार 820 सदस्यांची दि.26 व दि.27 डिसेंबर रोजी सुनावणी घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी सर्व प्रांताधिकार्‍यांना दिले आहेत. यानंतर अपात्रतेची कारवाई होणार आहे. 

राखीव प्रवर्गातून विजयी झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांत जात वैधता (पडताळणी) प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. राज्य शासनाने यामध्ये बदल करत जात वैधता प्रमाणपत्र सादरीकरण करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय  घेतला. त्यानुसार 11 ऑक्टोबरला अध्यादेश काढण्यात आला. या अध्यादेशात ग्रामपंचायतीसाठी 31 मार्च 2016 ही तारीख निश्‍चित करण्यात आली. त्यानुसार या तारखेनंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वर्षभराची तर यापूर्वी झालेल्या निवडणुकांसाठी जुनीच सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

जिल्ह्यात 31 मार्च 2016 पूर्वी 2015 मध्ये 465 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत, तर त्यानंतर 2017 मध्ये 487 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत. या दोन्ही निवडणुकीतील राखीव प्रवर्गातून 3 हजार 820 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत तपासणी करण्याचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरू होते. त्यानुसार 30 ते 35 टक्के उमेदवारांनी मुदतीच नव्हे तर अद्याप जात वैधता प्रमाणपत्र दिलेले नाही. ज्यांनी दिले त्यांचे मुदतीत सादर झाले की नाही, याची पडताळणी करण्यात आली आहे. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर अपात्रतेचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधितांची सुनावणी घेतली जाणार आहे. याकरिता जिल्ह्यात दि.26 व दि.27 या तारखा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. संबंधित प्रांत या दिवशी सर्व विजयी उमेदवारांची सुनावणी घेणार आहेत. या दोन दिवसांनंतरही उमेदवार शिल्लक राहिले तर दि.28 रोजी उर्वरित उमेदवारांची सुनावणी घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. यानंतर 31 डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला याचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी अपात्रतेबाबत निर्णय घेणार आहेत. या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. 

प्राथमिक तपासणीत 35 टक्के उमेदवारांनी अद्याप प्रमाणपत्रच दिले नसल्याने त्यांच्यावर कारवाई निश्‍चित होणार असल्याचे सांगण्यात येते. ज्यांनी दिले आहे, ते मुदतीत आहे की नाही हे पाहून निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे या कारवाईत अनेकजण अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे.

12 महिने मुदत असलेल्या ग्रामपंचायती    487

 राखीव प्रवर्गातील विजयी उमेदवार    1782

 राखीव प्रवर्गातून विजयी झालेले सरपंच    200

6 महिने मुदत असलेल्या ग्रामपंचायती    465

राखीव प्रवर्गातील विजयी उमेदवार    1646

 राखीव प्रवर्गातून विजयी झालेले सरपंच    192