Sat, Feb 29, 2020 17:16होमपेज › Kolhapur › गोकुळ निवडणुकीचा बिगुल

गोकुळ निवडणुकीचा बिगुल

Last Updated: Dec 13 2019 1:29AM
कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) 2020 ते 2025 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 3659 हे गोकुळ व्यवस्थापनाने दिलेले क्रियाशील सभासद असून त्यांना मतदानाचा अधिकार असेल, असे सहकार विभागीय उपनिबंधक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी सुनील शिरापूरकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 16 ते 21 डिसेंबरपर्यंत संस्थांना ठरावाचा नमुना पोहोच होईल; तर 23 डिसेंबर ते 22 जानेवारी या कालावधीत ठराव जमा करून घेतले जाणार असल्याचे शिरापूरकर यांनी सांगितले. यानिमित्ताने गोकुळच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.

सुनील शिरापूरकर म्हणाले, प्रारूप मतदार यादी कार्यक्रमासाठी सहनिबंधक करवीर (दुग्ध) गजेंद्र देशमुख यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. 23 एप्रिल 2020 रोजी विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपणार आहे. तत्पूर्वी 13 किंवा 20 एप्रिल 2020 ला गोकुळसाठी मतदान घेण्याची नियोजित तारीख असू शकते. दरम्यान, गोकुळकडून 3659 क्रियाशील मतदारांची यादी प्राप्त झाली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीसाठी 3263 क्रियाशील मतदार होते. यंदा 396 मतदारांची भर पडली आहे. 23 एप्रिल 2017 पूर्वी नोंदणी झालेले हे सभासद आहेत.

या दूध संस्थांना 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत ठरावाची प्रत आणि नमुना पत्र पाठविले असून रजिस्टर पोस्टाने पोहोच केले जाईल. या संस्थांनी हिरव्या रंगाच्या ठरावाची प्रत आणि पत्र 23 डिसेंबर 2019 ते 22 जानेवारी 2020 या महिनाभराच्या कालावधीत सहनिबंधक दुग्ध यांच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात पोहोच करायचे आहे. त्यानंतर आठ दिवसांत छाननी प्रक्रिया सुरू होईल. 5 फेब—ुवारी 2020 च्या दरम्यान प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या जातील. त्यानंतर दहा दिवस हरकती स्वीकारल्या जातील. पुढील दहा दिवसांत सुनावणी आणि निर्णय प्रक्रिया पूर्ण होऊन 1 मार्च 2020 च्या दरम्यान अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. साधारण 10 मार्चपासून उमेदवारी अर्ज स्वीकारून पुढील सुट्टी वगळता 35 दिवसांत निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 13 किंवा 20 एप्रिल मतदान घेण्याची नियोजित तारीख आहे. यात आणखी थोडा बदल होऊ शकतो. मात्र, 23 एप्रिल 2020 पूर्वी मतदान व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे शिरापूरकर म्हणाले.

क्रियाशील सभासदाचा निकष

2013 च्या सुधारित सहकार कायद्यात क्रियाशील आणि अक्रियाशील सभासदाचे निकष दिले आहेत. पाच वर्षांत एका सर्वसाधारण सभेला हजर असावा, हा सर्वसाधारण नियम आहे; तर संस्थांना दिलेल्या उपविधी अधिकारानुसार गोकुळने वर्षातील 240 दिवस सरासरी 50 लिटर दूध संस्थेने घातले असावे, असा निकष लावला आहे. दोन्हीपैकी एका निकषात बसणारी दूध संस्था क्रियाशील सभासद म्हणून मतदानास पात्र असेल, असे सुनील शिरापूरकर यांनी स्पष्ट केले. तसेच अक्रियाशील सभासदास दरवर्षी 31 मार्चला जाहीर व वैयक्‍तिक नोटीस पाठवावी लागते. मात्र गोकुळ व्यवस्थापनाने अशी कोणतीही प्रक्रिया राबविलेली नाही. अक्रियाशील ठरवून एकाही सदस्याला नोटीस दिलेली नाही. त्यामुळे गोकुळने सादर केलेले 3659 मतदार सहकार कायद्यानुसार क्रियाशील ठरत असल्याचेही शिरापूरकर यांनी सांगितले.

संस्थांनी ठराव करताना एकाच नावाने करावा. एकापेक्षा अधिक व्यक्‍तीच्या नावे ठराव आल्यास संपूर्ण संस्थेचे मतदार अधिकार गोठवला जाण्याची शक्यता आहे. सहकार विभागाने पाठविलेल्या नमुन्यानुसारच ठराव आणि संस्थेचे पत्र जमा करावे. सद्य:स्थितीत वापरात असलेले इतिवृत्तच ग्राह्य धरले जाईल. वर्षातील 180 दिवस 250 लिटर दूध घातलेला संचालक किंवा सभासद याच्या नावे ठराव करता येईल. संस्थेच्या सचिव आणि चेअरमन यांच्या स्वाक्षरीसह संस्थेचा गोल शिक्‍का व सील करून ठराव पाठवावा, असे आवाहन सुनील शिरापूरकर यांनी केले आहे.