होमपेज › Kolhapur › चोरट्यांनी घातला भक्‍तांच्या श्रद्धेवरच घाला!

चोरट्यांनी घातला भक्‍तांच्या श्रद्धेवरच घाला!

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 11:24PMगडहिंग्लज  :  प्रवीण आजगेकर

एखाद्या मंदिरामध्ये चोरी करणे म्हणजे आजही समाजामध्ये महापाप समजले जाते. महाराष्ट्र व कर्नाटक परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काळभैरी मंदिरामध्ये चोरट्यांनी चोरी करून देवाचे दागिने नव्हे, तर लाखो भाविकांच्या श्रद्धेवरच घाला घातला आहे. यापूर्वी 11 जुलै 1986 मध्ये चोरट्यांनी शहरामध्ये असलेल्या मंदिरामधील देवाचा 72 तोळ्यांचा मुखवटा लंपास केला होता. 
मंदिरातील चोरीस गेलेले सर्वप्रकारचे दागिने नव्याने करण्याची जबाबदारी महालक्ष्मी यात्रा समितीने घेतली असून, त्यामुळे भाविकांमधील संताप थोडा कमी झाला असला, तरी श्रद्धेवर घाला घालणार्‍या चोरट्यांचा शोध घेणे आवश्यक आहे.  गडहिंग्लजला काळभैरीची पांढरी अशीच ओळख मिळाली असून, एखाद्याने कोणावर अत्याचार केल्यास काळभैरीच्या पांढरीमध्ये फार दिवस चालत नाही, असेच बोलले जात होते.  

11 जुलै 1986 मध्ये गडहिंग्लजच्या काळभैरी मंदिरामध्ये चोरी झाल्यानंतर भाविकांनी गडहिंग्लज बंद करून घटनेचा निषेध नोंदवला होता. याबरोबरच त्यापुढे अनेक दिवस यातील चोरट्यांना पकडण्यासाठी विविध प्रकारची आंदोलनेही झाली होती. काळभैरव नामाचा जपही यावेळी करण्यात आला होता. तब्बल  32 वर्षांनी परत एकदा काळभैरवाच्या मंदिरामध्ये चोरी झाल्याने जुन्या चोरीची  चर्चा सुरू झाली. सोशल मीडियापासून पार कट्ट्यापर्यंत केवळ चोरीचीच चर्चा रंगली आहे. पोलिसांनी वेगाने तपासकार्य सुरू केले आहे. 

यात्रा समितीने जबाबदारी स्वीकारली

गुरुवारी काळभैरी मंदिरामध्ये ज्या वस्तूंची चोरी झाली आहे त्या नव्याने करण्याबाबत शनिवारी गडहिंग्लमधील महालक्ष्मी मंदिरामध्ये बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत यात्रा समितीचे अध्यक्ष रमेश रिंगणे व सदस्यांनी या नव्या दागिन्यांची जबाबदारी घेत, हे सर्व दागिने यात्रा समितीकडून तयार करून देणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, भक्‍तांच्या श्रद्धेवर घाला घालणार्‍या चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणीही केली.