Tue, Jul 07, 2020 19:10होमपेज › Kolhapur › मालवाहतूक महागणार

मालवाहतूक महागणार

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 15 2018 12:50AMकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले

वाढत्या इंधन दरवाढीचा फटका माल वाहतूकदारांना सर्वाधिक बसत असून, मालाच्या टनावर नाही तर खर्चावर आधारित भाडे मिळावे,  अशी मागणी ट्रक वाहतूकदारांमधून होत आहे. यासाठी मालाच्या वाहतुकीमध्ये 25 टक्के वाढीची मागणी कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या सदस्यांनी केली आहे. दोन दिवसांत कोल्हापुरात होणार्‍या असोसिएशनच्या बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. माल वाहतुकीमध्ये 25 टक्के भाडेवाढ झाल्यास, महागाईवर त्याचा परिणाम होणार असून, सामान्य जनतेला याचा फटका बसणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीवर भारतातील इंधनाचे दर बदलले जातात. सध्या कच्चा तेलाच्या किमती या कमी असल्या, तरी केंद्र व राज्य शासनाच्या विविध करांच्या बोजामुळे पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. याचा सर्वाधिक फटका देशांतर्गत मालाची वाहतूक करणार्‍या ट्रक  वाहतूकदारांना बसत आहे. गेल्या सहा महिन्यांत डिझेलच्या प्रतिलिटर दरात 12 रुपयांची उच्चांकी वाढ झाली; पण मालवाहतूक दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे मालवाहतूक दरात वाढ करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूकदार संघटनांनी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या मोठी असून, येथे उत्पादित होणार्‍या साखर व गुळाची मुंबई व अहमदाबाद येथे वाहतूक होते. औद्योगिक संस्थांमधूनही कच्च्या व पक्क्या मालाची वाहतूक होते.  जिल्ह्यात 16 हजार ट्रक आहेत.दररोज कोल्हापूर-मुंबई मार्गावर  विविध मालाची वाहतूक करणारे 2500 ट्रक, तर कोल्हापूर-अहमदाबाद  मार्गावर वाहतूक करणारे दोन हजार ट्रक धावतात. कर्नाटक, राजस्थान व गोवा या मार्गावरही रोज दहा टन गूळ किंवा साखरेची वाहतूक करण्यासाठी टनावर मालाचे भाडे आकारले जाते.सध्या 900 ते एक हजार रुपये टन याप्रमाणे भाडे आकारणी केली जाते. त्याप्रमाणे 16 टनासाठी 16 हजार रुपये आकारले जातात. ट्रकचे एक लिटर डिझेलला 3 ते 3.5 किलोमीटर अ‍ॅव्हरेज पकडता कोल्हापूर-मुंबई या 450 किलोमीटर अंतरासाठी अंदाजे दीडशे लिटर डिझेल लागते.

डिझेलच्या प्रतिलिटर 70 रुपये दराप्रमाणे डिझेलसाठी साडेदहा हजार ते अकरा हजार रुपये खर्च येतो.  या मार्गावर असणार्‍या टोलसाठी 2800 रुपये खर्च येतो. मालाची भरणी व उतरणी करण्यासाठी 2500 रुपये  खर्च येतो. हा सर्व खर्च पकडता 16 हजार रुपये खर्च होतो. त्यामुळे ट्रक चालकाकडे एक रुपया शिल्‍लक रहात नाही, असे वाहतूकदार संघटनांचे म्हणणे आहे. अन्य राज्यांमध्ये वाहतूक करतानाही वाहतूकदारांना तोटा सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.

मालाच्या टनावर दर आकारणी करणे परवडत नसल्याचे चित्र असल्याने वाहतुकीच्या खर्चावर हा दर आकारण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. सध्या मालाची वाहतूक करण्यासाठी टोल, मालाची भरणी व उतरणी, लागणार्‍या डिझेलचा विचार करता 31 रुपये प्रतिकिलोमीटर  खर्च येतो. खर्चावर आधारित हा दर 45 ते 50 रुपये प्रतिकिलोमीटर असावा, अशी मागणी ट्रक मालकांमधून होत आहे. म्हणजेच टनाला किमान 1300 रुपये भाडे मिळावे, अशी मागणी भाडेवाढीच्या प्रस्तावात करण्यात येणार आहे. कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद  तसेच राजस्थान,  कर्नाटक व गोवा राज्यांमध्येही मालाची वाहतूक होते. नवीन प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून होणार्‍या वाहतूक मार्गावरील दरांमध्ये याची तत्काळ अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. मालाच्या वाहतूक दरात वाढ झाल्यास, त्याचा महागाईवर परिणाम होऊन महागाई भडकण्याची शक्यता आहे.

दरवाढ आवश्यक : सुभाष जाधव 

कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, इंधनाचे वाढते दर, टोल व ट्रकचा मेंटनन्स पाहता सध्या असणारे भाडे हे न परवडणारे आहे. टनावर आधारित भाडे न आकारता खर्चावर आधारित ही भाडेवाढ असणार आहे. दोन दिवसांत होणार्‍या असोसिएशनच्या बैठकीत या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाल्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखाने, उद्योजक, व्यापारी यांना माहिती देऊन नवीन भाडेवाढीप्रमाणे मालाची वाहतूक करण्यात येणार आहे. असोसिएशनचा हा निर्णय जिल्ह्यातील सर्व माल वाहतूकदारांना लागू होणार आहे.