Thu, Sep 24, 2020 06:47होमपेज › Kolhapur › महाडिक यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला हादरा

महाडिक यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला हादरा

Published On: Sep 03 2019 1:44AM | Last Updated: Sep 02 2019 11:57PM
कोल्हापूर : सतीश सरीकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या भाजप प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला. महाडिकांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील भाजपला बळ मिळणार आहे, तर राष्ट्रवादीला मोठा हादरा बसणार आहे. महाडिक गटाचे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांसह काही पदाधिकारीही सोडचिठ्ठी देणार असल्याने राष्ट्रवादीसमोर गळती रोखण्याचे आव्हान असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवरच महाडिक भाजपमध्ये जात असल्याने राष्ट्रवादीला त्यांचे आव्हान ठरणार आहे. कारण, प्रत्येक तालुक्यात महाडिक गटाचे अस्तित्व असून आता ते भाजप म्हणून कार्यरत होईल. 

लोकसभा निवडणुकीत स्वपक्षीयांकडून घात झाल्याने महाडिकांना अक्षरशः दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. महाडिक यांच्या जिव्हारी हा पराभव लागला होता. त्यानंतर कुटुंबीय व समर्थकांतून महाडिक यांच्यावर पक्ष बदलाबाबत दबाव वाढत गेला. चुलतभाऊ अमल महाडिक भाजपचे आमदार आहेत. त्यांच्या पत्नी शौमिका महाडिक भाजपच्या चिन्हावर जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आल्या असून त्या विद्यमान अध्यक्षा आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी महाडिक यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यामुळेच त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेण्याचा निर्णय घेतला. 

युवाशक्‍तीच्या माध्यमातून धनंजय महाडिक राजकारणात आले. 2004 मध्ये शिवसेनेतून लोकसभा निवडणूक लढविली; परंतु पराभव झाल्यानंतर ते पुन्हा शिवसेनेकडे फिरकले नाहीत. राष्ट्रवादीच्या सान्‍निध्यात राहिले. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी  त्यांनी फिल्डींग लावली. परंतू उमेदवारी मिळाली नाही. 2014 ला त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. पाच वर्षे खासदार राहिले. पराभवानंतर पुन्हा महाडिक यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आहे. लोकसभा निवडणूकीपासून ते राष्ट्रवादीवर नाराज होते.

राष्ट्रवादीत जिल्हास्तरीय नेते फक्‍त आ. हसन मुश्रीफ व धनंजय महाडिक हेच आहेत. त्यापैकी महाडिकांनी  भाजप प्रवेश केल्यानंतर मुश्रीफ हे एकमेव नेते राष्ट्रवादीत राहिले आहेत. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व माजी आमदार के. पी. पाटील हेही आहेत. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीकडे जिल्हाभर ओळखीचा असे चेहरे नाहीत. अंतर्गट गटबाजीमुळे आधीच राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी पक्ष बदल केले आहेत. काही वर्षापूर्वीपर्यंत सत्ताधारी असलेला आणि नंतर जनमताच्या रेट्याने विरोधी बाकावर जाऊन बसल्याने राष्ट्रवादीला मरगळ आल्याची स्थिती आहे. महाडिक यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीला धक्‍का बसणार आहे. दोन खासदार, सहा आमदार असल्याने जिल्ह्यात शिवसेनेचे वजन आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढण्यासाठी महाडिक यांचा चांगलाच उपयोग होणार आहे.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभर भाजप प्रवेशासाठी अनेकांची रांगच लागली आहे. यापूर्वीही अनेक नेत्यांनी भाजप प्रवेश केला. आताही राष्ट्रवादीसह इतर पक्षातील आमदार व पदाधिकारी भाजप प्रवेश करत आहेत. परंतू कुणालाही पक्षीय पातळीवरील जबाबदारी सोपविण्यात आलेली नाही. कारण भाजपमध्ये पक्षातील निष्ठावंतांनाच पक्षीय जबाबदारी देण्यात येते. मात्र महाडिक यांना प्रवेशानंतर थेट प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात येणार आहे. साहजिकच महाडिकांचे भाजपमध्येही वजन वाढणार आहे.

दक्षिणेत सतेज-अमल यांच्यातच लढत

काँग्रेसचे आ. सतेज पाटील व माजी खासदार धनंजय महाडिक कट्टर विरोधक आहेत. लोकसभा निवडणूकीत तर त्यांचे वैर टोकाला गेले. लोकसभा निवडणूकीनंतरच महाडिक यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. विधानसभा निवडणूकीत कोल्हापूर दक्षिणमधून सतेज पाटील यांच्याविरूध्द धनंजय महाडिक रिंगणात उतरणार अशा चर्चांना ऊत आला आहे. परंतू कोणत्याही स्थितीत विधानसभा लढणार नसल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दक्षिणेत सतेज पाटील व अमल महाडिक यांच्यातच सामना रंगणार आहे. धनंजय व अमल एकाच पक्षात असल्याने आता संपूर्ण महाडिक कुटुंब एकत्रितच प्रचारात उतरणार हे स्पष्ट आहे.

ताराराणी आघाडीचे अस्तित्व स्वतंत्र राहणार

माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी महापालिकेत ताराराणी आघाडीच्या नावावर अपक्षांची मोट बांधून राजकारण केले. पक्षीय राजकारण आल्यानंतर ताराराणी आघाडी बाजूला पडत गेली. त्यानंतर महाडिक यांनी ताराराणी आघाडी पक्ष स्थापन केला. महाडिक यांचे पुत्र स्वरूप हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे भाऊ अमल हे भाजपचे आमदार आहेत. आता धनंजय महाडिक भाजपमध्ये डेरेदाखल होणार असल्याने महालिकेतील ताराराणी आघाडीही भाजपमध्ये विसर्जित होणार का, या चर्चेला ऊधाण आले आहे. मात्र महापालिकेतील ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम यांनी ताराराणी आघाडी हा भाजपचा मित्र पक्ष आहे. शहरात आणि महापालिका राजकारणात ताराराणी आघाडीचे अस्तित्व स्वतंत्र राहणार असल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची अवस्था बिकट

राष्ट्रवादीला जिल्ह्यात आ. मुश्रीफ वगळता नेता नसल्याची वस्तुस्थिती आहे. मुश्रीफ म्हणजे राष्ट्रवादीचा एकखांबी तंबू अशी अवस्था झाली आहे. कागल वगळता जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिशाहीन बनले आहेत. गटबाजीने राष्ट्रवादीला पोखरले आहे. राष्ट्रवादीची उमेदवारी म्हणजे विजय असे समीकरण पाहिलेल्या राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेसह महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समितीतील संख्या हातांच्या बोटांवर मोजण्याइतपत घसरली आहे. मित्रपक्ष काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची अवस्था बिकट झाली आहे.