Thu, Jul 02, 2020 18:08



होमपेज › Kolhapur › पावसाळ्यात ग्रामस्थांचे सक्तीने स्थलांतर

पावसाळ्यात ग्रामस्थांचे सक्तीने स्थलांतर

Last Updated: Apr 28 2020 1:16AM

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री सतेज पाटील



कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यात परिस्थितीनुसार ग्रामस्थांचे सक्तीने स्थलांतर केले जाईल, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. गेल्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन आठ दिवसांत  आदर्श कार्यप्रणालीचा (एसओपी) आराखडा तयार करावा, असे आदेशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाटील यांनी सोमवारी मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. प्रारंभी त्यांनी जिल्ह्यातील धरणांचा सध्याचा पाणीसाठा आणि गतवर्षीचा पाणीसाठा याची माहिती घेतली. ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे बोटी आहेत, त्या सर्वांची नोंद ठेवून यादी बनवावी. जिल्हा परिषद, महापालिका अशा विविध शासकीय यंत्रणांच्या बोटींची दुरुस्ती करून त्या सज्ज ठेवाव्यात. ग्रामीण भागात विशेषत: शिरोळ तालुक्यात गेल्या महापुरात बोटींबाबत काही अडचणी आल्या होत्या. त्याबाबत तयारी ठेवावी. महसूल, आरोग्य, पशुसंवर्धन, महावितरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, कृषी अशा सर्वंच विभागांनी आदर्श कार्यप्रणाली तयार ठेवावी. 

जिल्ह्यात 15 जुलै ते 31 ऑक्टोबर या कालावधीत शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना  नेमणुकीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असेल, असे सांगत शिरोळ, करवीर, राधानगरी आदी तालुक्यांत योग्य ठिकाणे शोधून हेलिपॅड तयार करा. पशुसंवर्धन विभागाने जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून जनावरांचे सर्वेक्षण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. मोबाईल कंपन्यांनी यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी पूर्वतयारी ठेवावी. बोटींची संख्या वाढवावी. खासगी रुग्णालयांनी धोका पातळीपूर्व रुग्ण दाखल करून घेऊ नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, पाटबंधारे विभागाने जूनच्या आत धरणांच्या दुरुस्तीबाबत विशेषत: फाटकवाडी, बर्कीच्या दुरुस्तीची प्रलंबित कामे पूर्ण करावीत. पडणार्‍या पावसाबाबत आणि करण्यात येणार्‍या उपाययोजनांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत स्वतंत्रपणे एफएम वाहिनी सुरू करण्याचा विचार आहे. सर्व तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी गेल्या वेळी आलेल्या अडचणींबाबत आणि अल्प मुदतीत उपाययोजना करण्याबाबत सविस्तर अहवाल तयार करावा. कमी कालावधीत जादाचा पाऊस गतवर्षी पडला होता. त्याबाबत पाटबंधारे विभागाने आगाऊ सूचना देण्याबाबत नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, प्रातांधिकारी वैभव नावडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.

गृहनिर्माण संस्थांनीही बोटींची व्यवस्था करावी

मोठी रुग्णालये, गृहनिर्माण संस्था यांनीही स्वतंत्र बोटींची व्यवस्था करावी. यामुळे तातडीने उपाययोजना करण्यास मदत होणार आहे. शहरासह जिल्ह्यातील बोटींची संख्या, भौगोलिक परिस्थिती यामुळे तातडीच्या उपाययोजनांसाठी स्वतंत्र बोटी असल्यास फायदेशीर ठरेल, असेही यावेळी बैठकीत सांगण्यात आले. यासह पाण्यातून जाणार्‍या सायलेन्सरवर असणार्‍या मोठ्या चाकांच्या चारचाकी वाहनांची (थार वाहन) यादी तयार करावी, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.

अभ्यास करून नियोजन करा

जिल्ह्यात 2005 ला महापूर आला होता. यानंतर 2019 मध्ये जिल्ह्यात पूरस्थिती महागंभीर झाली होती. या दोन्ही महापुरांचा अभ्यास करावा आणि त्यानुसार नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी पाटबंधारे विभागाला केली. पाणी पातळी 43 च्या पुढे गेल्यास नागरिकांचे सक्तीने स्थलांतर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.