Wed, Aug 12, 2020 13:02होमपेज › Kolhapur › ‘कोल्हापूर-मुंबई’साठी सकाळीच स्लॉट हवा

‘कोल्हापूर-मुंबई’साठी सकाळीच स्लॉट हवा

Published On: Jul 18 2019 1:57AM | Last Updated: Jul 18 2019 1:52AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेसाठी आठवड्यातून चार दिवस आणि दुपारी 12 चा स्लॉट देण्याची तयारी ‘जेव्हीके’ने बुधवारी दर्शवली. मात्र, कोल्हापूर-मुंबईसाठी सकाळीच स्लॉट हवा, या मागणीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील आग्रही राहिले. त्यानुसार सकाळी साडेदहाच्या स्लॉटबाबत अभ्यास करून पुढील बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ‘जेव्हीके’च्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेतून कोल्हापूर-मुंबई मार्गावर ट्रू-जेट आणि स्टार एअर या दोन कंपन्यांना विमानसेवेला मंजुरी मिळाली आहे. धावपट्टीचे विस्तारीकरण झाल्यानंतर स्टार एअरची सेवा सुरू होणार आहे.दरम्यान, ट्रू-जेटने सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबईतील स्लॉटअभावी अद्याप या सेवेला मुहूर्त मिळालेला नाही. राज्याचे महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी मुंबईत याप्रश्‍नी बैठक घेतली. या बैठकीत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत मुंबई विमानतळ व्यवस्थापन करणार्‍या ‘जेव्हीके’ आणि विमान वाहतूक करणारी कंपनी ट्रू-जेट यांच्या अधिकार्‍यांना सबबी बाजूला ठेवून कोल्हापूरसाठी सेवा सुरू करण्याबाबत सुनावले होते. पाटील यांच्या ठाम भूमिकेमुळे नरमलेल्या ‘जेव्हीके’ने प्रारंभी सकाळच्या सत्रात स्लॉट देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, या कालावधीत कंपनीला ऑपरेशन करण्यात तांत्रिक अडचण होती. या पार्श्‍वभूमीवर बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे ‘जेव्हीके’ने स्पष्ट केले होते. 

बुधवारी मुंबई विमानतळावर ‘जेव्हीके’चे तन्वीर मौल्वी, कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया, ट्रू-जेट कंपनीचे आशिष तालेवार यांची बैठक झाली. बैठकीत ‘जेव्हीके’ने दर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे चार दिवस दुपारी 12 चा स्लॉट देऊ, असे स्पष्ट केले. दुपारी 12 वाजता मुंबईतून विमानाचे टेकऑफ होईल आणि दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी ते कोल्हापुरात लँड होईल. यानंतर दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी त्याचे कोल्हापुरातून टेकऑफ होईल आणि दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी ते मुंबईत लँड होईल, असे स्पष्ट केले. मात्र, ही वेळही प्रवाशांच्या द‍ृष्टीने गैरसोयीचीच ठरणारी असल्याने ही माहिती मंत्रालयात पालकमंत्री पाटील यांना फोनद्वारे देण्यात आली. त्यांनी सकाळीच स्लॉट देण्याच्या सूचना करत दुपारचा स्लॉट नको, असे स्पष्ट केले. 

कोल्हापूर विमानतळ संचालक कटारिया यांनीही सकाळीच स्लॉट देण्याची मागणी केली. यानंतर सकाळी साडेदहाच्या स्लॉटवर चर्चा करण्यात आली. सकाळी साडेदहाचा स्लॉट दिला, तर मुंबईतून सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी टेकऑफ होईल. कोल्हापुरात साडेदहा वाजता लँडिंग होईल, त्यानंतर 11 वाजता विमानाचे कोल्हापुरातून टेकऑफ होऊन मुंबईत 12 वाजून 10 मिनिटांनी लँडिंग होऊ शकते. मात्र, याबाबतही अंतिम निर्णय झाला नाही. 

सकाळच्या सत्रातील स्लॉटबाबत अभ्यास केला जाईल, त्यानुसार स्लॉटचा निर्णय घेतला जाईल, असेही ‘जेव्हीके’च्या वतीने बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यामुळे कोल्हापूर-मुंबई विमानसेवा लांबण्याची शक्यता आहे. अनेक मार्गांवर ट्रू-जेट कंपनीच्या वतीने कोल्हापूर-मुंबई मार्गासह जळगाव, नांदेड, अहमदाबाद आदी शहरांना सेवा दिली जाणार आहे. याकरिता कंपनीचे एकच विमान वापरले जाणार आहे. अहमदाबादहून सकाळी साडेसात वाजता सुटणारे विमान जळगावला जाणार, जळगावहून ते मुंबईला येणार. यानंतर मुंबईहून कोल्हापूरला येईल. कोल्हापुरातून पुन्हा मुंबईला जाईल. मुंबईतून ते पुन्हा नांदेडला जाईल, नांदेडहून ते मुंबईला परत येईल, मुंबईहून पुन्हा जळगावला जाईल आणि जळगावहून ते रात्री अहमदाबादला जाणार आहे. अहमदाबाद विमानतळावर हे विमान पार्किंगसाठी थांबणार आहे. यामुळे कोल्हापूरला सकाळच्या सत्रात स्लॉट मिळाला, तरी तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, मुंबई-कोल्हापूरसाठी सकाळच्या सत्रातील स्लॉट मिळाला, तर कंपनीने त्या वेळेत विमान उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली असल्याचे आजच्या  बैठकीत सांगण्यात आले. बहुतांश विमान कंपन्यांची अशाच प्रकारे दिवस-रात्र सेवा सुरू असते. त्यामुळे कोल्हापूरला सकाळच्या सत्रात स्लॉट मिळण्यात विमान उपलब्ध नसल्याचा अडसर तर नाही ना, अशी शंकाही प्रवाशांतून व्यक्‍त होत आहेत. 

पुढील बैठकीत निर्णय

आजच्या बैठकीत दुपारचा स्लॉट अमान्य करण्यात आल्यानंतर सकाळी साडेदहाच्या स्लॉटबाबत चर्चा झाली. त्यावर अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा अभ्यास झाल्यानंतर याबाबत पुन्हा बैठक घेऊन स्लॉटचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. पुढील बैठकीची तारीख यावेळी निश्‍चित करण्यात आली नाही. मात्र, येत्या आठवड्यात ही बैठक होईल, असे सांगण्यात आले.

पाच दिवसांचा स्लॉट हवा

बैठकीत पाच दिवसांच्या स्लॉटची मागणी कायम होती. ट्रू-जेट कंपनीला दिलेल्या स्लॉटपैकी जळगाव आणि नांदेडचा एक स्लॉट कोल्हापूरला द्यावा, याबाबतही चर्चा झाली. मात्र, हे स्लॉट कमी करण्याऐवजी कोल्हापूरला स्वतंत्र आणखी दोन स्लॉट देण्याची मागणी करण्यात आली. ‘जेव्हीके’ने दोनऐवजी आणखी एक स्लॉट देण्याची तयारी दर्शवली. यामुळे कोल्हापूरला तीनऐवजी चार दिवस विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री पाटील मात्र नियमित सेवेसाठी आग्रही आहेत. पहिल्या टप्प्यात दररोज शक्य नसले, तरी आठवड्यातील पाच दिवसांचा स्लॉट हवा हा त्यांचा आग्रह कायम आहे. त्यानुसार निर्णय होण्याचीही शक्यता आहे.