Wed, Sep 23, 2020 10:20होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात पूर पातळी स्थिर

कोल्हापुरात पूर पातळी स्थिर

Last Updated: Aug 08 2020 1:20AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

गेले दोन दिवस कोल्हापूरकरांच्या उरात धडकी भरवत झपाट्याने वाढणारी पंचगंगेची पातळी शुक्रवारी मात्र स्थिर राहिली. दिवसभरात पंचगंगेची पातळी अवघ्या तीन इंचांनी वाढली. यामुळे पूर पातळीही स्थिर होती. जिल्ह्याच्या अन्य भागात पुराला काही प्रमाणात उतार सुरू झाला आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील पाणी ओसरल्याने हा मार्ग रात्री वाहतुकीसाठी खुला झाला. गगनबावडा तालुक्यातील कुंभी नदीवरील तीन बंधारे खुले झाले आहेत.

जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर ओसरला. अधूनमधून कोसळणारी मोठी सर वगळता दिवसभरात बहुतांशी ठिकाणी पावसाची उघडीपच राहिली. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात विशेषत: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दुपारपर्यंत पाऊस होता. मात्र, त्याचा जोर गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत कमीच होता. पावसाने उसंत घेतली, त्यात दिवसभरात अधूनमधून होत असलेल्या सूर्यदर्शनामुळे गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत आज जनजीवन पूर्वपदावर आले होते.

गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेने अवघ्या दोन दिवसांत धोक्याची पातळी ओलांडली. पंचगंगेला महापूर आला, त्यात धरणांतून विसर्ग सुरू झाला. शहरातील नागरी वस्तीतही गुरुवारी मध्यरात्रीपासून पाणी शिरण्यास सुरुवात झाली. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते. शुक्रवारची सकाळ उजाडताच दारात पाणी तर नसेल ना, या विचारातच गतवर्षी पुराचा तडाखा बसलेल्या अनेकांनी गुरुवारची रात्र काढली. मात्र, शुक्रवार सकाळपासून शहरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पावसाने तर विश्रांती घेतलीच; पण पाणी पातळीत वाढ झाली नाही. रात्री वाढलेले पाणी आज सकाळपासून आहे त्या ठिकाणी स्थिरावले होते.

राधानगरी धरणाचा शुक्रवारी पहाटे तीन वाजता चौथ्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला. यापूर्वी तीन व सहा आणि त्यानंतर पाचव्या क्रमांकाचा असे तीन दरवाजे खुले झाले होते. सध्या एकूण चार दरवाजे खुले असून, वीजनिर्मिती आणि चार दरवाजे असा धरणातून एकूण 7,112 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातूनही आज विसर्ग वाढवण्यात आला असून, धरणातून सध्या 6 हजार 500 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरणातूनही 4,800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कासारीतून 1,350, तर कुंभीतून 300 क्युसेक्स विसर्ग होत आहे.

गुरुवारी रात्रीपासून स्थलांतराच्या तयारीत असलेल्या अनेक नागरिकांना आज दिवसभर स्थिर राहिलेल्या पूर पातळीने काहीसा दिलासा मिळाला. पंचगंगेची पाणी पातळी सकाळी आठ वाजता 44.7 फुटांवर होती. सकाळी 11 वाजता ती 44.9 इंचांपर्यंत वाढली. त्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत ती स्थिर होती. रात्री दहा वाजता ती 44.10 फूट इतकी झाली. शहरात पाणी पातळी स्थिर असली, तरी जिल्ह्याच्या अनेक भागात पुराचे पाणी ओसरू लागले. कोल्हापूर-गगनबावडा या मार्गावर मरळी, कळे, खोकुर्ले, मांडुकली, मार्गेवाडी, शेणवडे, किरवे आदी ठिकाणी कुंभी नदीचे पाणी होते. ते दिवसभरात ओसरत गेले. सायंकाळी सातच्या सुमारास किरवे येथील पाणीही गेल्याने तीन दिवसांपासून बंद असलेला कोल्हापूर-गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. कुंभी नदीवरील सांगशी, असळज, काताळे हे तीन बंधारेही खुले झाले.

कोल्हापूर-राधानगरी मार्गावर हळदी येथे भोगावती नदीचे पाणी आले आहे. राधानगरी धरणातील विसर्गामुळे त्यात आज वाढ होईल, अशी शक्यता होती. मात्र, या ठिकाणी पाणी पातळी दिवसभर स्थिर राहिली. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर अद्याप पाणी आहे. मात्र, गुरुवारच्या तुलनेत आज पाणी पातळीत काहीशी घट झाली. आंबेवाडी-चिखली मार्गावर आलेले पाणी आज दुपारपासून कमी होऊ लागले आहे. जिल्ह्यातही बहुतांशी ठिकाणी अशीच परिस्थिती होती. करवीर, गगनबावडा, राधानगरीसह पन्हाळा तालुक्यांतील पाणी पातळी कमी होत असताना हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांतील पंचगंगेच्या पाणी पातळीत काहीशी वाढ सुरू झाली आहे. कोल्हापूर शहरातून पुढे सरकणार्‍या पाण्यामुळे ही वाढ होत आहे.

शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत धरण क्षेत्रात चिकोत्रा धरण वगळता उर्वरित सर्व धरण परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यानंतर दिवसभरात पाटगाव वगळता अन्य धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 56.40 मि.मी. पाऊस झाला. गगनबावडा, राधानगरी, आजरा आणि चंदगड तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. गगनबावड्यात 148.50 मि.मी., चंदगडमध्ये 104.67 मि.मी., आजर्‍यात 79.25 मि.मी., तर राधानगरीत 76.83 मि.मी.पाऊस झाला. भुदरगडमध्ये 47.80 मि.मी., कागलमध्ये 39.71 मि.मी., शाहूवाडीत 50.50 मि.मी., करवीरमध्ये 25.64 मि.मी., गडडिंग्लजमध्ये 24.14 मि.मी., पन्हाळ्यात 7.14, शिरोळमध्ये 7.29 तर हातकणंगलेत 12.38 मि.मी.पावसाची नोंद झाली.

 "