Wed, Sep 23, 2020 22:13होमपेज › Kolhapur › आता अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी भरारी पथके 

आता अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी भरारी पथके 

Published On: Dec 16 2018 1:36AM | Last Updated: Dec 16 2018 12:13AM
कोल्हापूर : अनिल देशमुख

अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथके नेमण्यात येणार आहेत. जलसंपदा विभागाने तसे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. टंचाईच्या झळा वाढत आहेत, त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य जलनीती 2003 नुसार पाण्याच्या वापराचा प्राधान्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे जलसंपदा विभागाकडून पाण्याचे नियोजन करण्यात येते. या नियोजनावरच वीज वितरण कंपनीकडून पंपांसाठी वीज जोडणी करण्यात येते. पाणी वापराचेे क्षेत्र विस्तीर्ण असल्याने विभागाला पूर्ण नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. यामुळे अनेकदा अनधिकृत पाणी उपसा होतो, त्यामुळे पाण्याचे नियोजन कोलमडते.

पाण्याचे नियोजन योग्य झाले नाही, तर त्याचा पिण्याच्या पाणीपुरवठा करणार्‍या योजनांवरही परिणाम होतो. त्यातून टंचाईची स्थिती गंभीर होते. या कालावधीत अनधिकृत पाण्याचा उपसा रोखणे, वीज जोडणी खंडित करणे आदी कामे कर्मचार्‍यांना प्रभावीपणे करता येत नाहीत. त्यातून कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्‍न निर्माण होतो. या सर्व पार्श्‍वभूमीवर जलसंपदा विभागाने अनधिकृत उपसा रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. महसूल मंडलनिहाय भरारी पथके स्थापन करावी लागणार आहेत. जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग अथवा जिल्हा परिषदेचा शाखा अभियंता या पथकाचा समन्वयक राहणार आहे. यात महावितरणचे शाखा अभियंता, मंडल अधिकारी व पोलिस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

मनुष्यबळाचा तुटवडा
जिल्ह्यात महसूल मंडलनिहाय पथक स्थापन करायचे झाल्यास 76 मंडल अधिकारी, 76 पोलिस उपनिरीक्षक, 76 वाहने आदींची पूर्तता करावी लागणार आहे. मनुष्यबळ आणि साधनसामग्री उपलब्ध करताना जिल्हा प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.