Sat, Jul 04, 2020 00:37होमपेज › Kolhapur › सहा हजार मतदारांवर प्रथमोपचार

सहा हजार मतदारांवर प्रथमोपचार

Published On: Apr 24 2019 1:38AM | Last Updated: Apr 24 2019 1:19AM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

लोेकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मतदान केंद्रावर  मतदारांसाठी जिल्ह्यातील 1807  मतदान केंद्रावर प्रथमोपचार किट सुविधा उपलब्ध केली होती. दिवसभरात 5 हजार 920 मतदारांवर उपलब्ध प्रथमोपचार किटद्वारे उपचार करण्यात आले. उपचारानंतर या रुग्णांनी मतदानाचा हक्‍कही बजावला.  

जिल्ह्यातील मतदारांचा टक्‍का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृती राबविण्यात आली होती. मतदानादिवशी कडाक्याच्या उन्हामुळे अनेकांना चक्‍कर, उलट्यांचा त्रास जाणवला. त्यामुळे मतदानाच्या रांगेतच काहीजण कोसळले. मतदानासाठी जाताना जरगनगर येथील मतदान केंद्रावर एक युवा मतदार पडल्याने तो जखमी झाला. मतदान केंद्रात प्रथमोपचार किट उपलब्ध असल्याने तेथे त्याच्यावर उपचार करणे सोयीचे झाले. उपचारानंतर युवकाने मतदानही केले. जिल्ह्यातील 5,920 मतदारांवर प्रथमोपचार किटद्वारे मतदान केंद्रावर उपचार झाले. जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच जिल्ह्यात असा उपक्रम राबविला गेला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मतदान केंद्रावर प्रथमोचार किट उपलब्ध ठेवल्याने मतदारांनी आरोग्य विभागाचे आभार मानले. 

जिल्ह्यातील मतदान केंद्रावर प्रथमोपचार किट उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी सक्रिय होते. आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका यांना याबाबत प्रशिक्षणही दिले होते. त्यामुळे मतदान केंद्रावर रुग्णांवर प्रथमोपचार करणे सुलभ झाले. 

व्हीलचेअर, रॅम्पचा दिव्यांगांना लाभ 

जिल्ह्यातील दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत, म्हणून जिल्ह्यातील मतदान केंद्रावर रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था निवडणूक यंत्रणेने उपलब्ध करून दिली होती.ज्याठिकाणी रॅम्प उपलब्ध नव्हते, तेथे लाकडी रॅम्पची व्यवस्था उपलब्ध केली होती. त्यामुळे दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे झाले. व्हीलचेअर व रॅम्पच्या उपलब्धतेमुळे गतवेळच्या तुलनेत यंदा दिव्यांग मतदारांचा टक्‍काही वाढल्याची चर्चा मतदान केंद्रांवर होती.