Sat, Feb 29, 2020 11:25होमपेज › Kolhapur › ‘एफआरपी’च्या दरात ऊसच परवडत नाही!

‘एफआरपी’च्या दरात ऊसच परवडत नाही!

Published On: Oct 31 2018 1:49AM | Last Updated: Oct 30 2018 11:35PMकुडित्रे : प्रा. एम. टी. शेलार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मूळचा पायाभूत 9.5 टक्के उतारा गृहीत धरून आलेली एफआरपी अधिक दोनशे रुपये असा दर मागितला आहे. म्हणजे 9.5 टक्के उतारा पायाभूत मानून एफआरपी काढली तर ती सूत्र बदलानंतर आलेल्या एफआरपीपेक्षा प्रतिटन 175 ते 195  इतका फरक येतो. 

सूत्र पूर्ववत करून आलेली एफआरपी आणि यातून तोडणी वाहतूक खर्च वजा करता येणारा दर ही पहिली उचल देऊन हंगाम सुरू झाल्यानंतर दोनशे रुपये देणे हा तोडगा स्वीकारला जाण्याची शक्यता 
आहे. त्यामुळे सध्याच्या निव्वळ एफआरपीमध्ये प्रतिटन 175 ते 195 रुपयांची वाढ  उत्पादकांना मिळणार आहे.

असा आहे उसाचा उत्पादन खर्च

उसासाठी नांगरट करून सरी सोडून लागण करेपर्यंत ते 16 ते 18 महिन्यांच्या कालावधीनंतर ऊस तुटून जाईपर्यंत एकरी 71 हजार 550 रुपये इतका खर्च येतो. या गुंतवणुकीवर 15 टक्के व्याज अधिक 10 टक्के परतावा (रिटर्न) मिळून 90 हजार 510 रुपये इतका खर्च येतो. 

जमीन महसूल, खंड, स्वत:ची व कुटुंबीयांची मजुरी, घसारा, विमा, देखरेख, विचारात घेतली तर व्यक्‍त व अव्यक्‍त खर्च मिळून 1 लाख, 15 हजार, 320 रुपये खर्च येतो. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील उसाची लावण व खोडव्याचे सरासरी उत्पादन 32 टन आहे. म्हणजे उसाचा प्रतिटन उत्पादन खर्च 3 हजार 421 रुपये इतका खर्च येतो. 

ऊस शेती आतबट्ट्यातच!

जून 2010 पासून रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत रासायनिक खताचे दर अडीच ते तिपटीने वाढले आहेत. अलीकडे शेणखताचा, कारखान्याच्या मळीचा, कंपोस्ट खताचा दर वाढला असला तरी उसासह सर्वच पिकांना रासायनिक खते दिली जात आहेत. केंद्र सरकारने साधारणत: एकरी 40 ते 50 टन उसाचे उत्पादन घेता यावे याद‍ृष्टीने नत्र - स्फुरद आणि पालाश यांचा 40:70: 70 असा फॉर्म्युला निश्‍चित केला आहे. या डोससाठी 2012 पूर्वी एकरी 6000 ते 7000 रुपये खर्च येत असे. 2012 नंतर यात अडीच पटीने वाढ झाली. म्हणजे एकरी हा खर्च 12 हजार 500 ते 14 हजार 500 एवढा झाला. आता त्यात पुन्हा 9 ते 12 टक्के वाढ झाली आहे. सध्या हा खर्च एकरी 13 हजार 625 ते 16 हजार 240 एवढा येत आहे.

उसाचा उत्पादन खर्च एकरी

हणमंतवाडी (ता. करवीर) येथील शेतकरी महादेव कदम यांनी लिहून ठेवलेला उसाचा एकरी उत्पादन खर्च असा : पहिली नांगरट एकरी 2000 रुपये, दुहेरी नांगरट म्हणजे द्वारणी एकरी एक हजार, सरी काढणे एकरी एक हजार, लावण करणे ऊस बेणे रोप लागण (6000 रोपे 1 रुपये 80 पैसेप्रमाणे) बारा हजार रुपये, लावण करणे मजुरांची (खंडित) मजुरी दोन हजार, आळवणी औषध 900 रुपये, खतांचा पहिला डोस (900 रुपये बॅगप्रमाणे 5 बॅग्ज) 4500 रुपये, भरणीचा डोस (900 रुपये बॅगप्रमाणे 8 बॅग्ज) 7,200 + खत घालणे मजुरी 300 रुपये, एकूण 7,500 रुपये, भरणीचे औत 2,000 रुपये, वाकुरी मारणे 1,000 रुपये, पाणीपट्टी एकरी 9000 रुपये, भांगलण / तणनाशक औषध 2,000 रुपये, मृगाचा डोस (900 रुपये प्रति बॅगप्रमाणे 6 बॅग्ज) 5,400 रुपये, मृगाचा खताचा डोस टाकणे मजुरी (5 गडी प्रमाणे 100 रुपये हजेरी) 500 रुपये, 25 पाणी प्रमाणे 100 रुपये पाणी पाजणे हजेरी एकूण 2,500 रुपये.  

एकूण उत्पादन खर्च 53,300 रुपये. त्याची व त्यांच्या कुटुंबीयांची मजुरी (365 दिवस प्रमाणे  50 रुपये हजेरी दिवसा) 18,250 रुपये. हा झाला सी-1+ एफ.एल. खर्च एकूण रुपये 71,550 रुपये अधिक या  गुंतवणुकीवरील व्याज (10 टक्के) 5,330 रुपये एकूण खर्च 76,880 रुपये.

सी-2+ एफ.एल. पद्धतीनुसार या खर्चावर त्याला 50 टक्के नफा देण्यास स्वामिनाथन समितीने सुचविले आहे.म्हणजे एकूण उत्पादन खर्च  76,880 रुपये + यावर 50 टक्के नफा             38,440 रुपये असे एकूण 1 लाख 15 हजार 320 रुपये त्याला मिळाले पाहिजेत.

एकरी उत्पादन : 30 टन गृहीत धरले तर त्याला प्रतिटन 3 हजार 844 रुपये दर देणे उचित आहे हे अर्थशास्त्रीय सत्य आहे..
  
  कुणाची किती एफआरपी...!

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे सन 2017 -18 च्या हंगामातील सरासरी साखर उतारे (टक्के), प्रतिटन तोडणी-वाहतूक खर्च (रुपये), 2018-19 च्या हंगामातील एफआरपी व तोडणी वाहतूक खर्च वजा जाता येणारी प्रतिटन वैधानिक उचल (रुपये) पुढीलप्रमाणे (अनुक्रमे कंसात)
जवाहर  (हुपरी) (12.81), (617), (3523), (2906)
श्री दत्त (शिरोळ)  (12.55), (575), (3451), (2877)
शरद (नरंदे)        (12.65), (590), (3479), (2889)
गुरुदत्त (टाकळी) (13.34), (580), (3669), (3089)
शाहू     (कागल)  (12.32), (560), (3388), (2828)
मंडलिक(ह.वाडा)(12.52), (590), (3443), (2853)
कुंभी (कुडित्रे)     (13.13),(553),(3611),(3057)
भोगावती (परिते) (11.91),(481),(3275),(2794)
दत्त (दालमिया ) (13.30),(616),(3657),(3042)
कोरे (वारणा)     (12.17), (542), (3347), (2805)
राजाराम (बावडा) (12.25), (550), (3369), (2819)
गडहिंग्लज (हरळी) (11.56), (508), (3179), (2671)
घोरपडे (कापशी) (12.36), (588), (3399), (2911)
आजरा (गवसे)  (12.41), (538), (3413), (2874)
दुधगंगा (बिद्री)  (12.92), (541), (3544), (3003)
पंचगंगा              (13.07), (649), (3594), (2945)
किसन अहिर       (12.95), (587), (3561), (2975)
विश्‍वास (शिराळा)(12.06), (594), (3316), (2812)
राजारामबापू      (12.82), (576), (3526), (2950)
सोनहिरा           (12.54), (562), (3449), (2886)
कोल्हापूर जिल्हा
   ( सरासरी )-----(12.51), (487), (3440), (2953)