Mon, Jul 13, 2020 12:41होमपेज › Kolhapur › विनाअनुदानित तंत्रशिक्षणच्या कर्मचार्‍यांचे वेतन थकीत

विनाअनुदानित तंत्रशिक्षणच्या कर्मचार्‍यांचे वेतन थकीत

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 27 2018 12:16AMकोल्हापूर : प्रवीण मस्के

राज्यातील विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील सुमारे 50 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍याचे  गेल्या काही महिन्यांपासूनचे वेतन थकित आहे. वेतनाचा प्रश्‍न गंभीर बनला असून कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

राज्यात अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण देणार्‍या सुमारे 700 संस्था असून 50 हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता दोन शासकीय तंत्रशिक्षण संस्था वगळता 22 तंत्रशिक्षण संस्थांमध्ये साडेतीन हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. 

विनाअनुदानित क्षेत्रातील जवळपास 80 टक्के तंत्रशिक्षण संस्थांमध्ये किमान  3 ते 27   महिन्यांपर्यंतच्या कालावधीचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन थकित आहे. थकित वेतनाकरिता समाजकल्याण खात्याकडून देय रक्कम मिळण्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे कारण संस्थाकडून सांगण्यात येते. बर्‍याच तंत्रशिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे कागदोपत्री वेतन अदा केल्याचे दाखवून वेतनातून दरमहा ठराविक रक्कम कपात केली जात असल्याचे शिक्षकांची सांगितले. 

थकित वेतन मिळावे यासाठी राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. मात्र, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अद्याप तंत्रशिक्षण संस्थांमधील कर्मचार्‍यांच्या वेतन प्रश्‍नाची दखल घेतली गेलेली नाही. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने थकित वेतनाच्या समस्येचा सर्वंकष विचार करुन विनाअनुदानित संस्थांमधील कर्मचार्‍यांचे वेनत सॅलरी अकौंटच्या माध्यमातून शासनामार्फत करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. या आदेशाची अंमलबजावणी होण्याची गरज आहे. समाज कल्याण विभाग व इतर विभागांकडून विविध शिष्यवृत्तीच्या माध्यमातून  देय रक्कम वेळेवर मिळणे आवश्यक आहे. 

गुणवत्तापूर्ण संस्थांना वेतन अनुदानाची गरज

कर्नाटक राज्यात सुरु असणार्‍या विनाअनुदानित तंत्रनिकेतनसाठी कर्नाटक सरकारने वेतन व वेतनेतर अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. वेतनावर प्रत्यक्ष खर्चावर आधारित शिक्षक शुल्काची रचना झाल्यास तंत्रशिक्षणाचा खर्च कमी होईल. शैक्षणिक शुल्क कमी झाल्याने शासनाचा शिष्यवृत्तीच्या रुपात होणारा काही कोटी रुपयांचा खर्च वाचणार आहे. वाचणार्‍या या पैशातून सर्व शासकीय नियमांचे पालन करुन गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार्‍या तंत्रशिक्षण संस्थांना वेतन अनुदान देण्याची गरज आहे. 

खासगी तंत्रनिकेतन संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या थकित वेतनाचा प्रश्न सुटलेला नाही. थकित वेतनामुळे शेतकरी आत्महत्यांप्रमाणेच विनाअनुदानित तंत्रशिक्षण क्षेत्रातील कर्मचार्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शासनाचे गंभीर विषयाकडे जाणूनबूजून दुर्लक्ष आहे. याचा विचार करण्याची गरज आहे.  -प्रा. श्रीधर वैद्य, राज्य सचिव, टीचर्स असोसिएशन फॉर  नॉन ऐडेड पॉलिटेक्निक (टॅफनॅप)