Sun, Sep 27, 2020 00:03होमपेज › Kolhapur › गव्यांपाठोपाठ आता हत्तींचे संकट

गव्यांपाठोपाठ आता हत्तींचे संकट

Published On: May 26 2019 1:44AM | Last Updated: May 26 2019 12:28AM
महागाव ः ना. शि. घोलप

गडहिंग्लज तालुक्याच्या पश्‍चिम भागात अलीकडच्या काळात वाढलेल्या हजारो हेक्टर क्षेत्रातील घनदाट जंगलात 200 हून अधिक गव्यांचे कळप अधिवास करीत आहेत, तर रानडुकरांची गणतीच करणे अवघड आहे. या उपद्रवी वन्यप्राण्यांच्या त्रासाने हतबल झालेल्या गडहिंग्लज व आजरा तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्‍यांवर शेती उद्योग गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे. अशातच शुक्रवारी तब्बल 12 वर्षांनंतर टस्करने महागाव परिसर व आजर्‍याच्या पूर्व भागात धुमाकूळ घातला. दोन दिवस दहशत माजवून हा टस्कर शनिवारी आजरा तालुक्यातील सिरसंगी, वाटंगी भागात गेला असला तरी तो परतण्याची भीती उपविभागातील शेतकर्‍यांच्या मनात कायम आहे.

गव्यांच्या कळपांच्या उपद्रवाने जंगलालगत असलेली हजारो हेक्टर शेती शेतकर्‍यांनी पड पाडली आहे. चार-पाच एकराचा मालक असलेल्या शेतकर्‍याला यामुळे मजूर म्हणून काम करावे लागत आहे. दुसर्‍या बाजूला अन्य आर्थिक पर्याय नसल्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे संकट शिरावर घेऊन शेती पिकविली जात आहे. परंतु, अलीकडच्या काळात मानव व वन्यप्राणी यांच्यातील वाढलेल्या संघर्षामुळे आक्रमक कळपांकडून मानवी वस्तीत शिरकाव होऊ लागला आहे.

यापूर्वी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात उपविभागात अनेकांचे जीव गेले आहेत. अनेकांना गंभीर दुखापतीला तोंड द्यावे लागत आहे. शेतीचे तर प्रचंड नुकसान होत असून, त्याची मिळत असणारी भरपाई उत्पादन खर्चाच्या तुलनेत तुटपुंजी असल्याने नुकसान नको पण प्राण्यांना आवरा, असे म्हणायची शेतकर्‍यांवर आली आहे. वाढलेल्या या संघर्षात माणसांबरोबर जंगली प्राण्यांनाही प्राणास मुकावे लागले आहे. हा संघर्ष थांबावा यासाठी सौरकुंपणाची कल्पना पुढे आली असून याला शासनाने वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत.

गव्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे, म्हणून रात्रीच्या वेळी शेतात राखणीला जाणार्‍या शेतकर्‍यांनी आता शेती रामभरोसे सोडली आहे. शासनाने हत्तींसह उपद्रवी वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

नुकसान भरपाई देणार ः वनविभाग

शुक्रवारी आलेल्या टस्कराने पिकांचे खाऊन फारसे नुकसान केले नसले तरी पाईपलाईन, ठिबक सिंचन व पाण्याच्या टाक्यांचे नुकसान केले आहे. पिकांचे तुडविले गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे वनविभागाकडून पंचनामे करण्यात येणार असून नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठविले जाणार आहेत. यासंदर्भात ग्रामपंचायतींना सूचना करण्यात येणार असल्याची माहिती वनरक्षक संजय कांबळे यांनी दिली.