Thu, Sep 24, 2020 06:51होमपेज › Kolhapur › ‘इको फ्रेंडली’ बांबू राख्यांची क्रेझ! (video)

‘इको फ्रेंडली’ बांबू राख्यांची क्रेझ! (video)

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 24 2018 1:04PMकोल्हापूर ः पूनम देशमुख 

गणेशोत्सव, रंगपंचमी आणि दिवाळी या उत्सवांमध्ये एक कॉमन ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून रुजतोय तो म्हणजे इको फ्रेंडली. आता यामध्ये रक्षाबंधन सणाचाही समावेश झाला आहे. कोल्हापुरात ‘इको फ्रेंडली’ बांबूच्या राख्यांचा ट्रेंड रुजतोय. त्याला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

भाऊ-बहिणीचे अनोखे नाते राखी पौर्णिमेमुळे अधिक द‍ृढ होते.  बदलत्या काळानुसार या सणालाही आधुनिक स्वरूप प्राप्‍त झाले आहे. विविध प्रकारच्या, आकाराच्या राख्यांनी बाजारपेठा सध्या सजल्या आहेत. यात बांबूपासून तयार केलेली पर्यावरणपूरक राखी सध्या कोल्हापूरच्या बाजारपेठेत लक्षवेधी ठरत आहे. बुरूड गल्‍ली येथील कुशल कारागिरांकडून ही पर्यावरण पूरक राखी तयार केली जात आहे. कोल्हापूरच्या ‘बांबू राखी’ ला राज्यभरातून मागणी होत आहे. 

आजची तरुण पिढी प्रत्येक गोष्टी पर्यावरणाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना पहायला मिळते. इको फ्रेंडली वस्तूंना पहिली पसंती दिली जाते. प्रत्येक सणाला ‘इको फे्रंडली’ची किनार लाभत आहे  हाच ट्रेंड लक्षात घेत बुरूड गल्‍लीतील कारागिरांंनी आसाममधून खास प्रशिक्षण घेऊन ही पर्यावरणपूरक राखी तयार केली आहे. मागील दोन वर्षांपासून कोल्हापुरात ही बांबू राखी तयार केली जात आहे.या राखीला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  मागील सहा महिन्यांपासून राखी तयार करण्याचे काम सुरू असून याकामी घरातील प्रत्येकाचे हात गुंतले आहेत. सकाळी सहा वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. रात्री एक वाजेपर्यंत त्यांचे हात थांबत नाहीत. 

पुणे, बेळगाव, कर्नाटक, मेळघाट आदी भागात आजअखेर 70 हजार राख्या पाठवल्या गेल्या आहेत. विविध राख्यांचे प्रकार यामध्ये उपलब्ध आहेत. या राख्या तयार करण्यासाठी त्यांनी आजरा, वैभववाडी येथील बांबू वापरला आहे. या बांबूपासून सहज फोल्ड होणारी काडी उपलब्ध होते. 

पारंपरिक व्यवसायाच्या चाकोरीत अडकलेला बुरूड समाज बाहेर पडत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने बांबूपासून आकर्षक सजावटीच्या वस्तू बनवल्या जात आहेत. यासाठी गावाची सीमा ओलांडत परेदशातूनही खास प्रशिक्षण घेऊन व्यवसायाला आधुनिक स्वरूप प्राप्‍त करून दिले जात आहे.  बांबूपासून आकर्षक व सुबक राख्या बनवून त्याला मणी आणि दोरा यांची सांगड घालत अधिक सुबक बनवण्यात आल्या आहेत. बांबू राखीला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रभरात हजारोंच्या संख्येने या बांबू राख्यांची विक्री सुरू आहे. 

आकर्षक आणि सुबक राख्यांना तरुणींची पसंती

प्रत्येक गोष्टीत नावीन्य शोधणार्‍या तरुणींना सध्या बांबूपासून तयार केलेल्या राखीचा पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध झाला आहे. रेशमी धाग्यात आकर्षक व सुबक कलाकृतीत तयार झालेली ही राखी तरुणींच्या पसंतीस उतरली आहे.