कसबा सांगाव ः वार्ताहर
कसबा सांगाव (ता. कागल) येथील शेती व्यवसाय विद्यामंदिर मतदान केंद्राच्या आवारात सकाळी नऊच्या दरम्यान 100 मीटर अंतराच्या आत थांबण्याच्या कारणावरून सरपंच रणजित कांबळे, अमोल माळी, अजित शेटे, मंजुनाथ वराळे, प्रकाश शिनगारे आदींना करवीरचे पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी पकडून गाडीत बसवल्यामुळे गोंधळ उडाला. दरम्यान, यावेळी घटनास्थळी येऊन आ. हसन मुश्रीफ यांनी दडपशाही पद्धतीने पोलिस भाजपचे काम करत असल्याचा गंभीर आरोप केला.
पोलिस कारवाईचे वृत्त कळताच आ. हसन मुश्रीफ हे घटनास्थळी आले. त्यांनी घटनेची माहिती घेऊन पोलिस उपअधीक्षक अमृतकर यांना कोणत्या गुन्ह्यावरून संबंधितांना अटक करत असल्याची विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. आ. मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. ही घटना लोकशाहीला घातक आहे. दडपशाही पद्धतीने पोलिस भाजपचे काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. अशाच प्रकारची कृत्ये यापूर्वीही गोकुळ दूध संघ आणि अनेक निवडणुकांवेळी पोलिसांकडून करण्यात आली आहेत. संबंधितांनी कोणताही गुन्हा केला नाही. बूथ ताब्यात घेतलेला नाही किंवा पैसे वाटले नाहीत, असे असताना जाणीवपूर्वक अशी कृत्ये पोलिस करत आहेत. याबाबत आपण वरिष्ठांकडे तक्रार करू.
या घटनेमुळे शांततेने चाललेल्या मतदानाला गालबोट लागेल, दंगा होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक अमृतकर यांनी संबंधितांवर गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती दिली. या प्रकारामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.सकाळी साडेसातच्या दरम्यान मतदान केंद्र क्र. 44 मध्ये एक मशिन सुमारे पाऊण तास बंद होते. हा प्रकार वगळता शांततेत मतदान झाले.