Thu, Sep 24, 2020 07:58होमपेज › Kolhapur › चांगल्या हवामानामुळे रब्बी तरारली!

चांगल्या हवामानामुळे रब्बी तरारली!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

निपाणी : मधुकर पाटील 

रब्बी हंगामात शेतकर्‍यांनी पारंपरिक पीक पद्धतीला प्राधान्य दिले आहे. गेल्या तीन, चार वर्षांपासून शेतकरीवर्गाला कडधान्याची मोठी झळ बसून लाखमोलाच्या दराने कडधान्याची खरेदी करावी लागल्याने यंदाच्या हंगामात शाळू, गहू, हरभरा या पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. 

निपाणी परिसर हा ऊस व तंबाखू पिकासाठी प्रसिद्ध असला तरी याला गेल्या तीन, चार  वर्षांपासून अपवाद ठरत आहे. यावर्षी अकोळ परिसर वगळता इतर ठिकाणी घेण्यात येणार्‍या या पिकाच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्यामध्ये या पिकाकडे दुर्लक्ष करून  शेतकरीवर्गाने पाण्याची सोय करून गहू, शाळू, हरभरा पीक घेतले आहे. यावर्षी निपाणी परिसरात परतीचा पाऊस झाला नसला तरी कडाक्याची थंडी व धुक्यामुळे ऊस पिकासह रब्बीतील पिकांना ते चांगले ठरले आहे. ऊस तूटून गेलेल्या क्षेत्रात तातडीने रानाची स्वच्छता करून शाळू, गहू, हरभरा या पिकाचे उत्पादन या भागातील शेतकर्‍यांनी बर्‍यापैकी घेतले. अद्यापही अशा काही ठिकाणच्या क्षेत्रावर मागास पेरणीची कामे सुरू आहेत. अनेक शेतकर्‍यांनी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला आहे.

गव्हाचे व शाळूचे पीक क्षेत्र वाढल्याने जनावरांसाठी गव्हाच्या काडसाराची व शाळवाच्या कडब्याची सोय होणार असून पावसाळ्यात लागणार्‍या चार्‍याची बेजमी काहीअंशी झाली आहे. 

येथील रयत कृषी केंद्राकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार एकूण 29 गावांत पिकाखाली येणारे क्षेत्र 53 हजार 62 एकर आहे. यामध्ये ज्वारीचे पीक 1395 हेक्टर,  मका 12 एकर, हरभरा 180 हेक्टर, गहू 275 हेक्टर, मोहरी 14 एकर, ऊस 6 हजार 460 हेक्टर, तंबाखू 4 हजार 310 हेक्टरमध्ये आहे. ही आकडेवारी पाहता शेतकरीवर्गाने हरभरापेक्षा गहू पिकाला बर्‍यापैकी प्राधान्य दिले आहे.