होमपेज › Kolhapur › तिरुपती विमान रद्द झाल्याने संतप्‍त प्रवाशांचा गोंधळ

तिरुपती विमान रद्द झाल्याने संतप्‍त प्रवाशांचा गोंधळ

Last Updated: Jan 22 2020 12:12AM
उजळाईवाडी : पुढारी वृत्तसेवा

‘इंडिगो’चे कोल्हापूर - तिरुपती विमान रद्द झाल्याने येथील विमानतळावर प्रवाशांनी गोंधळ घालत कंपनीच्या कर्मचार्‍यांना खडे बोल सुनावले. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. बंदचा फटका साधारणत: 60 प्रवाशांना बसला.

गेले 15 दिवस व्हिजिबिलिटीमुळे इंडिगोची कोल्हापूर - तिरुपती  विमानसेवा बंद होती. रविवारपासून ही सेवा पुन्हा सुरू झाली. दोन दिवस  विमान थोडे उशिरा आले होते. मंगळवारी इंडिगोकडून  विमान  वेळेत येणार असल्याने उपस्थित राहण्याची सूचना प्रवाशांना देण्यात आली होती. त्यानुसार सर्व प्रवासी सकाळी वेळेत  विमानतळावर उपस्थित राहिले. यावेळी विमान येण्यास थोडा उशीर लागणार असल्याचे सांगण्यात आले.  त्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाने विमान एक तास उशिरा येणार असे सांगण्यात आले.

बराच वेळ झाल्याने प्रवाशांनी   विचारणा सुरू केली असता ढगाळ वातावरणामुळे विमान रद्द केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दोन ते तीन तास विमानतळावर थांबलेले प्रवासी संतप्‍त झाले.त्यांनी कंपनीच्या कर्मचार्‍यांना धारेवर धरत गोंधळ घातला. शेवटी इंडिगो कंपनीने या प्रवाशांना बेळगाव व पुणे येथील विमानतळावर पाठविले. तेथून पुढचा प्रवास याच तिकीट दरात करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.