Sun, Sep 20, 2020 04:35होमपेज › Kolhapur › निष्काळजीपणा नको, दक्षता घ्या : डॉ. साई प्रसाद

निष्काळजीपणा नको, दक्षता घ्या : डॉ. साई प्रसाद

Last Updated: Sep 11 2020 7:21AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या अनपेक्षित आहे. मृत्यूदरही वाढत आहे. मात्र, घाबरून जाऊ नका, दक्षता घ्या. लक्षणे दिसताच वेळेत आणि योग्य उपचार घ्या, फाजील आत्मविश्वास आणि निष्काळजीपणा नकोच, असा सल्ला डायमंड हॉस्पिटलचे डॉ. साई प्रसाद यांनी दिला. डिसेंबरपूर्वी लस येणे कठीण आहे. यामुळे कोरोनासोबत पण सावध राहून जगायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

वाढती रुग्णसंख्या त्या तुलनेत जिल्ह्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालयात आवश्यक यंत्रणा सक्षम आहे का, व्हेंटिलेटर ऑक्सिजन नेटेड बेड याची नेमकी परिस्थिती काय, याबाबत विचारता डॉ. साई प्रसाद म्हणाले, खासगी रुग्णालये व सरकारी रुग्णालये या आपत्तीला तोंड देण्याचा निर्धाराने प्रयत्न करीत आहेत. व्हेंटिलेटर बेड तसेच ऑक्सिजन बीड यांची प्रमाणात कमतरता अजूनही असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

कोरोना उपयोजना आणि उपचाराबाबत खासगी वैद्यकीय क्षेत्र लांब आहे का, प्रशासन कारवाईचा इशारा देते, याबाबत खासगी वैद्यकीय क्षेत्रांची नेमकी स्थिती काय आहे, भूमिका काय आहे याबाबत विचारता ते म्हणाले, खासगी वैद्यकीय क्षेत्र उपचार आणि जनजागृती दोन्ही बाबतीत कार्यरत आहे. उपलब्ध यंत्रणा आणी व्यवस्थेव्यतिरिक्त कोरोनाचे आणखी रुग्ण दाखल करून घेणे, त्यांच्यासाठी वेगळी अतिदक्षता विभाग, विलगीकरण कक्ष तयार करणे यासाठी कार्य सुरू आहे. आरोग्य आणीबाणीच्या काळात खासगी वैद्यकीय क्षेत्र प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून लढा देत आहे. खासगी वैद्यकीय क्षेत्र आणि शासकीय वैद्यकीय क्षेत्र यांचीही सामूहिक जबाबदारी आहे. ती आम्ही पार पाडत आहोत. खासगी रुग्णालयानेही शक्य तितके आयसीयू बेड वाढवले आहेत, अन्यथा जिल्ह्याचा मृत्यूदर आणखी वाढला असता, असेही त्यांनी सांगितले. 

सरकारी यंत्रणा समाधानकारक काम करत आहे का, पुरेशी साधनसामग्री यंत्रणा उपलब्ध आहे का याबाबत ते म्हणाले,  आपल्या जिल्ह्यात रुग्णांची संख्या इतकी वाढेल याची कोणालाच कल्पना नसल्याने काही प्रमाणात मर्यादा येत आहेत; पण सरकारी यंत्रणा समाधानकारक काम करीत आहे असेच म्हणावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

अँटीबॉडीज तयार होत आहेत का, कोल्हापुरातील रुग्णांची नेमकी स्थिती काय आहे, याबाबत विचारता ते म्हणाले, कोरोना रुग्ण संख्येमध्ये आपण पीकपॉईंटकडे वाटचाल करीत आहोत. नवीन सापडणारे रुग्ण आणि डिस्चार्ज घेणार्‍या रुग्णांची संख्या जवळपास येत आहे. हर्ड इम्युनिटी निर्माण करण्यासारखी परिस्थिती अद्याप झालेली नाही. किती रुग्णांमध्ये अँटीबॉडी वाढल्या आहेत याची टक्केवारी ही अद्याप उपलब्ध नाही. डिसेंबरपूर्वी लस उपलब्ध होण्याची शक्यता नाही. त्यामुळे तोपर्यंत आपल्याला कोरोनासह जगावे लागेल. सर्व दक्षता घेणे आणी सावध राहणे याकडे लक्ष द्यावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या या टप्प्यात काय काळजी घ्यावी, मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, नागरिकांनी काय केले पाहिजे, याबाबत ते म्हणाले, पॉझिटिव्ह रुग्णांचे योग्य वैद्यकीय व्यवस्थापन, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आणि कंटेंन्मेंट धोरणाची अचूक अंमलबजावणी करणे गरजेची आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, तातडीने अलगीकरण करणे व त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन गरजेनुसार योग्य उपचार घेणे याद्वारे मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकेल. कोरूना बाबत भीती न बाळगता दक्षता घेणे गरजेचे आहे. फाजील आत्मविश्वास व निष्काळजीपणातून कोणतीही दक्षता न घेता बाहेर फिरणार्‍यांमुळे अनेकांना संसर्ग होत आहे. ते टाळावे लागेल. 

नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये. बाहेर गेल्यास मास्क घालणे तसेच सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे. गर्दीत जाणे टाळावे. श्वसनसंस्थेचे विकार असणार्‍या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घ्यावी. हात वारंवार धुवावे. शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल अथवा टिश्यूपेपर धरावा. सर्दी, खोकला, घसा खवखवणे, श्वास घ्यायला त्रास होणे, ताप, चव जाणे व वास न येणे अशी कोणतीही लक्षणे दिसत असल्याचा संशय आल्यास तातडीने स्वतःला घरातील इतर व्यक्तींपासून अलगीकरण करून घ्यावे व डॉक्टरांशी संपर्क साधावा. हात स्वच्छ धुतल्याशिवाय डोळे व नाकाला स्पर्श करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

जिल्ह्यात मृत्यूदर वाढत आहे, याबाबत विचारता डॉ. साई प्रसाद म्हणाले, एकाद्या रुग्णाला ऑक्सिजन लावायची वेळ येते, त्यावेळी तो गंभीरच असतो. यामुळे ज्या ठिकाणी ऑक्सिजन लावला जातो, त्या ठिकाणी एक तर चांगला फिजिशियन असणे, त्याद्वारे त्या रुग्णांवर उपचार सुरू होणे आवश्यक आहेत अथवा अशा रुग्णांना सीपीआरसारख्या रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. ऑक्सिजन लावून एक-दोन दिवस रुग्णाला तिथेच ठेवतो. परिस्थिती गंभीर झाली की सीपीआरसारख्या मोठ्या रुग्णालयात घेऊन येतो आणि मग, परिस्थिती हाताबाहेर जाते. त्याच वेळी योग्य उपचार झालेत आणि आयसीयू बेड आणखी वाढले तर मृत्यूदर कमी येईल असेही त्यांनी सांगितले.  

 "