Tue, Jul 07, 2020 08:17होमपेज › Kolhapur › पवारांना काय झाले माहीत नाही, त्यांची चिंता वाटते : चंद्रकांत पाटील

दुष्काळाचे राजकारण नको : चंद्रकांत पाटील

Published On: May 06 2019 2:01AM | Last Updated: May 06 2019 1:58AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

शरद पवारांना काय झाले माहीत नाही, ते काहीच मानायला तयार नाहीत, त्यांची चिंता वाटते, असा टोला लगावत दुष्काळाचे राजकारण करू नका, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केले. दुष्काळ निवारणाबाबत पवारांच्याच काय, पण सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या सूचनांचाही स्वीकार करू, असेही त्यांनी सांगितले. राज्यात ऑक्टोबरमध्येच दुष्काळ जाहीर केला असून, सुमारे 13 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, पवार अपुर्‍या माहितीच्या आधारे बोलत आहेत. त्यांचा ईव्हीएमवर विश्‍वास नाही. राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल त्यांना मान्य नाही. काहीही मानायचेच नाही, असे त्यांनी ठरवल्याने त्यांची चिंता वाटत आहे. दुष्काळाचे गणित ठरलेले असते, तरीही अशा प्रकारची विधाने करणे म्हणजे हा राजकारणाचाच भाग आहे. दुष्काळाच्या राजकारणाने वातावरण विचलित होत आहे.राजकारण करण्यापेक्षा दुष्काळात सर्वांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. 

पवार तर ग्रेट आहेत, ते प्रचंड अनुभवी आहेत. ते राज्यात मुख्यमंत्री होते, देशाचे कृषिमंत्री होते. भूकंपासारख्या आपत्तीत त्यांचे खूप मोठे काम आहे. त्यांनी टीका-टिपणी करण्याऐवजी सूचना कराव्यात, आणखी काय करायला हवे ते सांगावे, त्यांच्याच काय; पण सर्वसामान्य शेतकर्‍याने जरी सूचना केली, तर त्या स्वीकारण्याची भूमिका आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार असताना जानेवारी-फेब्रुवारीत दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली जायची. सर्वेक्षण झाल्यानंतर एप्रिलमध्ये केंद्राचे पथक यायचे, त्यानंतर मे महिन्यात निधी मिळायचा. मात्र, आमच्या सरकारने ऑक्टोबरमध्येच सर्वेक्षण सुरू केले. त्यानुसार केंद्र शासनाच्या निकषात बसणारे 151 तालुके निश्‍चित केले. यानंतरही काही गावांची पाहणी केली. सुमारे पाच हजार जादा गावे दुष्काळाच्या यादीत आणली. 30 ऑक्टोबर रोजी राज्यातील 28 हजार गावांत दुष्काळ जाहीर केला. नोव्हेंबर महिन्यात केंद्राचे पथक आले. डिसेंबर महिन्यात राज्याला आजवर कधीही मिळाली नाही, इतकी दुष्काळ निवारणासाठी 4 हजार 700 कोटी रुपयांची मदत जाहीर झाली. 151 तालुक्यांना केंद्राने निधी दिला. उर्वरित गावांना राज्य सरकारने निधी दिला. मदतीला वेळ लागेल म्हणून शासनाने सीएफ फंडातून दोन हजार कोटी रुपयांचा निधी दिला. आठ सवलतींचा लाभ तातडीने सुरू केला.

पिण्याचे पाणी, चारा आणि रोजगारावर लक्ष केंद्रित

दुष्काळात पिण्याचे पाणी, चारा आणि रोजगार या तीन घटकांवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे असे सांगत पाटील म्हणाले, थकीत वीज बिल भरून सुमारे हजारांवर पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. तातडीने पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तींची कामे हाती घेतली आहेत. यासह नव्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिली आहे. राज्यात दररोज 4 हजार 674 टँकर्स सुरू आहेत. टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकार्‍यांकडे दिले आहेत. 24 तासांत टँकर मंजुरीचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. जून अखेरपर्यंत गुरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. सुमारे एक लाख हेक्टरवर बियाणे, खते उपलब्ध करून दिली आहेत. शेतकर्‍यांकडून एक रुपया इतके नाममात्र भाडे घेऊन धरण, तलावातील जमिनी चारा लागवडीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. 1264 छावण्या सध्या सुरू असून त्यात 8 लाख 32 हजार 29 जनावरांची काळजी घेतली जात आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत पाच लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. केंद्र शासनाच्या निर्णयानुसार 100 दिवस काम द्यायचे आहे; पण 150 दिवसांचे काम दिले आहे. कोणी 365 दिवस कामाची मागणी केली, तर तसेही काम उपलब्ध करून दिले जाईल. आणखी पाच लाख लोकांना काम उपलब्ध होईल यादृष्टीने कामे तयार करून ठेवली असून, मजुरांची वाट पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पवारांचे विधान चिंताजनक

निवडणुकीचा निकाल वेगळा लागला तर उद्रेक होईल, हे शरद पवार यांचे विधान चिंताजनक असल्याचे पाटील यांनी सांगितले. मनसेविरोधात जाणार्‍यांबाबत कार्यकर्त्यांकडून जे होत आहे, तेही गंभीर आहे. एकीकडे लोकशाही माना असे सांगायचे आणि दुसरीकडे शारीरिक हल्ले करायचे, हे बरोबर नाही. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन आजअखेर वाटचाल केली, ते काँग्रेसला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करत आहेत, त्यांच्याविषयी काय बोलणार, असेही पाटील यांनी सांगत राज ठाकरेंवर बोलण्याचे टाळले. पवारांच्या कुटुंबातील कोणी लोकसभेत जाणार नाही, राज्यात भाजप-शिवसेना आघाडीला प्रचंड यश मिळेल, या विधानावर आपण आजही ठाम आहे, असे सांगत कोणी कोणाला मदत केली, नाही केली, अशी वक्‍तव्ये निकाल लांबल्यामुळे होत आहेत. निकाल उशिरा असला की अशा तर्क-वितर्कांना उधाण येत असते, असेही पाटील यांनी सांगितले.