Tue, Aug 11, 2020 21:56होमपेज › Kolhapur › पंचनामे करताना पूरग्रस्तांशी वाद नको : आयुक्‍त परदेशी यांच्या सूचना

पंचनामे करताना पूरग्रस्तांशी वाद नको : आयुक्‍त परदेशी यांच्या सूचना

Published On: Aug 15 2019 1:20AM | Last Updated: Aug 15 2019 12:59AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

पंचनामे करताना तसेच शासकीय मदत करताना पूरग्रस्तांशी वाद होईल, असे काही मुद्दे उपस्थित करू नका, अशा सक्‍त सूचना मुंबई महापालिका आयुक्‍त प्रवीणसिंह परदेशी यांनी बुधवारी सर्व अधिकार्‍यांना दिल्या. मोठ्या प्रमाणात औषधसाठा पाठवण्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक बुधवारी झाली. यावेळी पूरग्रस्तांचे पुनर्वसन, आरोग्य, पाणी पुरवठा, वीज जोडण्या, मदत निधी अशा विविध विषयांवर अत्यंत सूक्ष्म माहिती घेऊन भविष्यातील नियोजनाबाबत सूचना दिल्या.

आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुंबईमधून आरोग्य पथके पाठवण्यात आली आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात औषधांचा साठाही कोल्हापूरला पाठविण्यात आला आहे. नागपूर, लातूर, यवतमाळ येथूनही आरोग्य पथके आली असल्याचे सांगितले.

शेतकर्‍यांना सबसिडीवर पंप दिले आहेत. त्याचा वापर फवारणीसाठी करावा, असे सांगून मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. जास्तीत जास्त कशी मदत करता येईल, याबाबत आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पूरस्थितीबाबत संगणकीय सादरीकरण केले. ते म्हणाले, आजपर्यंत 162 टक्के पाऊस झाल्याने 43 फूट धोक्याची पातळी ओलांडून 55.7 फूट इतकी पंचगंगेची पाण्याची पातळी गेली. 321 गावांमध्ये 90 हजार 368 कुटुंबांतील 3 लाख 58 हजार 91 सदस्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. 224 शिबिरांमध्ये 75 हजार 958 पूरग्रस्त कुटुंबे दाखल झाले आहेत. 528 पाणी पुरवठा योजना बंद असून 169 पूर्ववत करण्यात आल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार पिकांचे 1 लाख 5 हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे.

यावर आयुक्‍त परदेशी म्हणाले, उर्वरित 359 पाणी पुरवठा योजना पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ती जादा मदत द्या. त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे हायड्रोलिक पथक कोल्हापूरला पाठवतो. त्याचबरोबर कंत्राटदारही पाठवतो. सीएसआरमधून या योजना दुरुस्त करून घ्या. पुढील 10 दिवसांत या योजना सुरू करून घ्या. महावितरणने सध्याची पूररेषा गृहित धरून आपले रोहित्र त्याचबरोबर उपकेंद्र योग्य उंचीवर स्थलांतरित करावेत. उपकेंद्राच्या स्थलांतरासाठी विकास आराखडा मंजुरी देताना विकासकांनी जागा दिली पाहिजे, अशी अट महापालिकेने घालावी. नवीन पाणी उपसा केंद्र बांधताना आताच्या पाण्याच्या पातळीचा विचार करून त्याची उंची वाढवावी.

पुरामध्ये उभे असणारे ऊस पीक कुजले आहे. सरासरी उत्पन्न धरून पीक कर्जमाफी  द्यावी, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली; तर खासदार संभाजीराजे यांनी कर्जमाफीपेक्षा सरसकट नुकसान भरपाई द्या, अशी शेतकर्‍यांची मागणी असल्याचे सांगितले. भात शेती, सोयाबीन आणि भुईमूग यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत योग्य निर्णय व्हावा, अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी केली.

पाण्याच्या स्रोतांची तपासणी करून त्याबाबत दूषित स्रोत बंद करा. मुंबई महापालिकेचे फॉगिंग मशिन पाठवण्यात येतील,असे सांगून आयुक्‍त परदेशी पुढे म्हणाले, पूरग्रस्तांच्या घरांबाबत कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या अनुषंगाने पूररेषेच्या वरील जागा निवडावी. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी गायरान जमिनीचा वापर करण्यात यावा. त्याचबरोबर काही ठिकाणी आहे ती घरे उंचावर बांधावी लागतील.

सांगली आणि कोल्हापूरसाठी वेगळे प्राधिकरण तयार करावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली. विशेष आपत्ती म्हणून या भागाला निधीची तरतूद करावी, अशी मागणी आमदार नरके यांनी केली. पुढील 3 महिन्यात रस्ते दुरुस्ती करा. जे पूल पाण्याखाली होते त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा. त्यासाठी किती निधी हवाय त्याची मागणी करा. यासाठी आयटीआय, इंजिनिअर्स महाविद्यायल यांची मदत घ्या, अशा सूचनाही आयुक्‍त परदेशी यांनी दिल्या.

बैठकीला नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, पोलिस महानिरीक्षक सुहास वारके, महापालिकेचे आयुक्‍त डॉ. मल्‍लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदी उपस्थित होते.