Sat, Feb 29, 2020 17:58होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात दरवर्षी जमतो एक हजार टन ‘ई कचरा’

जिल्ह्यात दरवर्षी जमतो एक हजार टन ‘ई कचरा’

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 11:26PMकोल्हापूर : पूनम देशमुख

टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, मोबाईल, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू सध्या जीवनावश्यक बनल्या आहेत. या वस्तूंमुळे जगणे सुसह्य होत असले तरी पर्यावरणाच्या समस्यांत ढिगाने वाढत आहेत. ई कचरा आज सर्वात मोठी समस्या बनली आहे. गंभीर आजारांचे स्त्रोत बनलेल्या या ई कचर्‍याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातच दरवर्षी तब्बल एक हजार टन ‘ई कचरा’ तयार होतो. या कचर्‍याची विल्हेवाट लावणे दिवसेंदिवस मुश्किल होत आहे.

बॅटरी, मोबाईल , इव्हर्टर, टीव्ही,  कम्युप्टर, फॅक्स मशिन, फोन, केबल, टायर्स, वाहनांचे सुटे भाग, वॉशिंग मशिन, लॅपटॉप, कॅमेरा, पंखे, मायक्रोवोव्हन, फ्रीज, इस्त्री, इलेक्ट्रॉनिक खेळणी, मिक्सर, व्हॅक्युम क्लिनर आदी वस्तू दैनंदिन जीवनात वापरल्या जातात. मात्र, या वस्तूंमुळे तयार होणार्‍या ई कचर्‍याची समस्या अद्याप दुर्लक्षित आहे. माऊस, की बोर्ड, मोबाईलचे खराब झालेले स्पेअरपार्ट किंवा बंद पडलेली विविध उपकरणे ही ई कचरा प्रकारात मोडतात. या ई कचर्‍यामुळे मनुष्याच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.  शास्त्रीय पध्दतीने ई कचर्‍याचे निमूर्लन होणे सद्यस्थितीत आवश्यक झाले आहे. यासाठी सर्वांनीच जबाबदारी घेणे गरजेचे आहे. 

ई कचर्‍यामुळे लहान मुलांपासून वृध्दांनाही श्‍वसनाचे आजार उद्भवत आहेत. ई कचर्‍याला वेळीच आवर घातली नाही तर भविष्यात ई कचर्‍याचे डोंगर निर्माण होतील आणि आरोग्याची समस्या आणखी बिकट होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

ई कचर्‍याचे करायचे काय?

शहरातील उद्योग - व्यवसायाचा विस्तार, अत्याधुनिक वस्तू वापरण्याची जीवनशैली, कॉल सेंटर्स, सॉफ्टवेअर कंपन्या, सरकारी कार्यालये, मोबाईलधारकांची वाढलेली संख्या याचा विचार करता येथील ई कचर्‍याचा आढावा घेणे गरजेचे झाले आहे. एखादी नवी वस्तू खरेदी केल्यानंतर जुनी वस्तू फेकून न देता संग्रहित ठेवण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. त्यामुळे वापरात नसलेल्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तुंचा कचरा घराघरांत वाढतो आहे. या कचर्‍याचे नेमके करायचे काय हे कोणालाच माहित नाही. मात्र, टाकाऊपासून टिकावू वस्तू बनविल्या तर काही अंशी ई कचर्‍याचे प्रमाण कमी होईल.

रिसायकलिंग गरजेचे

काही देशांत मोठा खड्डा खोदून त्यात ई कचरा टाकून त्यावर मातीचा भराव टाकला जातो. कालांतराने ई कचर्‍यातील अतिविषारी घटक मातीचे प्रदूषण करतात. काही देशांत एक हजार अंश सेल्सिअस तापमानाच्या भट्टीमध्ये ई कचरा जाळून राख केली जाते. या दोन्ही पध्दती पर्यावरणाच्या दृष्टिने घातक आहेत. मुळात ई कचर्‍यावर पुर्नप्रक्रिया करून पुर्नवापर करणे खर्‍या अर्थाने  पर्यावरणपूरक ठरेल. त्यामुळे धातू व इतर घटक वेगळे केले जातील. प्रदूषण निमूर्लन नियमावलीनूसार ई कचर्‍याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे.  ई कचर्‍याचे रिसायकलिंग करणे गरजेचे बनले आहे.