Sun, Oct 25, 2020 08:20



होमपेज › Kolhapur › 'खासगी रुग्णालयांनी उपचार नाकारल्यास गुन्हा दाखल करु'

'खासगी रुग्णालयांनी उपचार नाकारल्यास गुन्हा दाखल करु'

Last Updated: Aug 05 2020 2:14PM

जिल्हाधिकारी दौलत देसाई



कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा  

जिल्ह्यातील खासगी रूग्णालयांनी उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांवर बेड उपलब्ध नाही, या कारणास्तव उपचार करण्यास नकार दिल्यास अशा रूग्णालयांवर साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे.

खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणारा रुग्ण नाकारणे हा गुन्हा असल्याचे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी म्हटले की, जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड आरक्षित करण्यात आले असून २० टक्के बेड नॉन कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आहेत. कोल्हापूर शहरात महापालिका आयुक्तांमार्फत तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत बेड आरक्षित करण्यात आले आहेत.

वाचा : कोल्हापूर : कोवाड बंधारा पाण्याखाली, बाजारपेठेत पाणी शिरले 

जिल्ह्यात खासगी रुग्णालयात येणारे कोविड, नॉन कोविड रुग्ण बेड उपलब्ध नाही या कारणास्तव दाखल करुन घेतले जात नाहीत अशी वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनी खासगी रुग्णांलयाना इशारा दिला आहे. खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपचारासाठी येणारा रुग्ण कोविड रुग्ण असो किंवा नॉन कोविड असो त्याला उपचारासाठी दाखल करुन घ्यावे. अशा रुग्णांवर कोविड संदर्भातील योग्य ती काळजी घेऊन त्याच्यावर उपचार सुरु करावेत. दुसऱ्या दिवशी अशा रुग्णांस ज्या ठिकाणी बेड उपलब्ध आहे त्या ठिकाणी उपचारासाठी पाठवून द्यावे.

वाचा : कोल्हापूर : भडगाव पूल पाण्याखाली, गडहिंग्लज -चंदगडचा संपर्क तुटला
 

तसेच खासगी रुग्णालयांकडे उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णास बेड उपलब्ध नाही या कारणास्तव नाकारल्यास अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करुण्यात येईल. प्रसंगी अशा रुग्णालयांवर गुन्हे ही दाखल करण्यात येतील. महापालिका क्षेत्रात आयुक्त आणि नगरपालिका क्षेत्रात संबंधित नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तहसिलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्यामार्फत रुग्ण नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येऊन गुन्हे दाखल केले जातील, असेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.





 







"