Sat, Feb 29, 2020 13:08होमपेज › Kolhapur › ब्‍लॉग : तुकोबांच्या सुपुत्रांनी दाखविला पालखी सोहळ्याचा राजमार्ग; यंदा सोहळ्याचे ३३३ वे वर्ष..!

ब्‍लॉग : तुकोबांच्या सुपुत्रांनी दाखविला पालखी सोहळ्याचा राजमार्ग..!

Published On: Jul 06 2018 4:00PM | Last Updated: Jul 06 2018 4:06PMहमिदवाडा : मधुकर भोसले

एकाच वेळी लाखो भाविक येऊन भव्यतेने साजरे होणारे अध्यात्मिक सोहळे अनेक असू शकतील. मात्र आपल्या लाडक्या दैवताला भेटण्यासाठी तीन आठवडे संतांचा व देवाचा गजर करीत जाणारा वारी नावाचा अलौकिक सोहळा दुर्मिळ आहे. या पालखी सोहळ्याची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी पाहता जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे तृतीय सुपूत्र तपोनिधी नारायण महाराज देहूकर हे या पालखी सोहळ्याचे जनक आहेत. १६८५ साली त्यांनी पहिला सोहळा सुरू केला. आज हा सोहळा लाखोंच्या घरात पोहोचला आहे.

वारी हे महाराष्ट्राच्या लोकजीवणाचे एक समृद्ध अंग आहे. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ७५० वर्षांपूर्वी भागवत म्हणजेच वारकरी संप्रदायाचा वेलू ज्ञानेश्वर माउलींनी लावला व हाच शुद्ध भक्तीचा वेलू गगनावरी गेला आहे. या सांप्रदायिक प्रवासात वारीचे महत्त्‍व अनन्यसाधारण आहे. सायकलीपासून ते हेलिकॉप्टरपर्यंत वैयक्तीक किंवा सरकारी दळण वळणाची साधने असताना, प्रत्येकाला निवारा व खायला अन्न मिळत असताना व पंढरीत जाण्यासाठी कसलेच आमिष नसताना आजच्या माहिती तंत्रज्ञानाचा काळात देखील लाखो पावले पंढरीची वाट उन्हापावसात पायीच चालतात. याचे अप्रूप अगदी परदेशी अभ्यासक व पत्रकारांना देखील आहे. कोणतीही जाहिरात नाही, निमंत्रण नाही की कोणीतरी केलेली वाहनांची सोय नसते तरीही महाराष्ट्र, कर्नाटक, अंधेप्रदेश, तामिळनाडू, गोवा, मध्यप्रदेश आदी राज्यांतून १०० ते ५००० पर्यंत वारकर्‍यांचा सहभाग असणाऱ्या या दिंड्या शेकडो वर्षे वारीची परंपरा श्रद्धेने पुढे चालवत आहेत.

गाथेच्या माध्यमातून पाचवा वेद निर्माण करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा यंदा ३३३ वा पालखी सोहळा आहे. वारीच्या म्हणजेच सोहळ्याच्या समुह स्वरुपात पंढरीस जाण्याची ही वारीची परंपरा तुकाराम महाराज यांचे सुपूत्र तपोनिधी नारायण महाराज देहूकर यांनी १६८५ साली सुरु केली.  वैशाख महिना उजाडला की वारकर्‍यांना वारीचे वेध लागतात. तुकाराम महाराजांच्या सोहळ्याचे प्रस्थान ज्येष्ठ वैद्य सप्तमीला देहूतून शुक्रवारी (५ जुलै) झाले. 

माऊलींच्या स्वतंत्र सोहळ्यास १८३२ ला प्रारंभ

तुकाराम महाराजांच्या पश्‍चात ३६ वर्षांनी त्यांचे सुपूत्र नारायण महाराज यांनी वारीची सुरुवात केली. देहू येथून तुकोबारायांच्या व तसेच पुढे आळंदीत जाऊन ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पादूका आपल्या गळ्यात घेऊन नारायण महाराजांनी वारीची परंपरा सुरु केली. १६८५ ते १८३१ पर्यंत तुकोबाराय व ज्ञानेश्‍वर माऊली यांचे पालखी सोहळे एकत्रीतपणे जात होते. पुढे १८३२ पासून माऊलींचा सोहळा स्वतंत्रपणे सुरु झाला. ग्वाल्हेरच्या शिंदे संस्थानकडे सरदार असलेल्या सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे हैबतबाबा आरफळकर हे निसिम माऊली भक्त होते. त्यांनीच या माऊलींच्या स्वतंत्र सोहळ्याची परंपरा १८३२ मध्ये सुरू केली. त्यांना कर्नाटक मधील अंकली गावचे शितोळे सरकार यांचे या सोहळ्यासाठी खूप मोठे सहकार्य लाभले. आज देखील रिंगण सोहळ्यातील आश्व, मानपान आदी परंपरा उर्जितसिंग शितोळे सरकार यांचेकडे आहेत.  माऊलींचे प्रस्थान हे तुकाराम महाराजांच्या प्रस्थानानंतर दुसर्‍या दिवशी असते. हे प्रस्थान आज शनिवारी (६ जुलै ) झाले. वैशाख म्हणजे साधारणत: मे महिना उजाडला की वारकर्‍यांना वारी सोहळ्याची आस लागते. तुकाराम महाराज व ज्ञानेश्‍वर माऊली या मुख्य सोहळ्यांबरोबरच अन्य संतांचेही पालखी सोहळे विविध ठिकाणाहून निघतात. 

शंभुराजेंचेही पाठबळ

जगद्गुरु तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु शिष्यांचे नाते सर्वज्ञात आहे. तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना उद्देशून काही अभंग रचना केल्या. व स्वराज्यास आशीर्वाद दिले. वारकरी हे स्वराज्यासाठी सहकार्य करत होते. याचा राग औरंगजेबाला होता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ५ वर्षांनी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरु झाला. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांनी या सोहळ्याला राजाश्रय दिल्याचे संदर्भ सापडतात. तेव्हा सुरु झालेला वारीचा प्रवास त्या काळात औरंगजेब व पारतंत्र्याच्या काळात ब्रिटीशांनी विरोध करुन देखील खंडीत झाला नाही. त्यामुळे भक्ती आणि शक्तींचा संगम वारकरी परंपरा व हिंदवी स्वराज्य यातून अनुभवास येतो.