Mon, Jul 06, 2020 04:07होमपेज › Kolhapur › बजेटचा फुगा फुटला; 100 कोटींची तूट

बजेटचा फुगा फुटला; 100 कोटींची तूट

Published On: Apr 24 2018 1:27AM | Last Updated: Apr 24 2018 12:07AMकोल्हापूर : सतीश सरीकर 

कोल्हापूर महापालिकेतील गेल्या वर्षीच्या बजेटचा फुगवटा फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. 2017-18 च्या बजेटमध्ये तब्बल शंभर कोटींची तूट आल्याने महापालिका अधिकार्‍यांचा अकार्यक्षमपणा समोर आला आहे. तुटीचा गंभीर परिणाम शहरातील विकासकामांवर होणार आहे. दरम्यान, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांनी सादर केलेले 2018-19 चे बजेटही अद्याप निश्‍चित नसल्याने त्यावर महापौर सौ. स्वाती यवलुजे यांची स्वाक्षरी झालेली नाही. त्यामुळे विकासकामांचा बोजवारा उडणार आहे.  

दरवर्षी महापालिकेचे बजेट 31 मार्चच्या सुमारास सादर केले जाते. सुरुवातीला महापालिका प्रशासन वार्षिक बजेट तयार करून ते स्थायी समितीला सादर करते. त्यानंतर स्थायी समितीच्या वतीने त्यात बदल सुचवून अंतिम मंजुरीसाठी बजेट महासभेला सादर करण्यात येते. महासभेत बजेटवर शिक्कामोर्तब होते; परंतु अधिकारी वर्ग आपण किती (?) काम करतो हे दाखविण्यासाठी अनेकदा बजेटची आकडेवारी फुगवतात. त्यानुसार बजेट तयार होते; परंतु वर्ष संपले तरी त्यांचे टार्गेट पूर्ण होत नाही, ही  वस्तुस्थिती आहे. 

वसुलीत घरफाळा विभाग अव्वल

घरफाळा विभागाला 54 कोटींचे टार्गेट देण्यात आले होते.  या विभागाने एप्रिलपासूनच वसुलीसाठी कंबर कसली होती. त्यामुळे तब्बल 51 कोटी 91 लाख जमा करण्यात या विभागाला यश मिळाले आहे. एकूण टार्गेटपैकी या विभागाने 86 टक्के रक्कम वसूल केली आहे. त्यामुळे वसुलीत हा विभाग टॉपला आहे. एलबीटी विभागाने 141 कोटी म्हणजेच तब्बल 97 टक्के रक्कम महापालिका तिजोरीत जमा केली असली तरी त्यातील प्रत्यक्षात 14 कोटी जमा झाले असून उर्वरित रक्कम ही राज्य शासनाकडून दर महिन्याला आलेले एलबीटीपोटीचे अनुदान आणि मुद्रांक शुल्कपोटी मिळालेल्या अनुदानाची आहे. पाणीपुरवठा विभागाची वसुली अत्यंत निराशाजनक आहे. या विभागाला 56 कोटींचे टार्गेट असताना केवळ 37 कोटीपर्यंत वसुली झाली आहे.  

बजेट अन्यायी असल्याचा आरोप

विद्यमान स्थायी समिती सभापती ढवळे यांनी महापालिका सभेत 31 मार्चला बजेट सादर केले; परंतु ते सभागृहात आले तरी बजेटची आकडेवारी निश्‍चित नव्हती. नगरसेवकांसह प्रसिद्धी माध्यमांनाही बजेटची आकडेवारी दिलेली नव्हती. त्यानंतर विकास निधी वाटपात सभापती ढवळे यांनी स्वतःसह मर्जीतील नगरसेवकांनाच जास्त निधी दिल्याचा आरोप सत्ताधारी काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी महापौर स्वाती यवलुजे यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत केला. तसेच विरोधी पक्षनेता विलास वास्कर यांनीही बजेटमध्ये नगरसेवकांना समान निधी दिली नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे 2018-19 च्या बजेटवरही अद्याप निर्णय झालेला नाही. 

Tags : Kolhapur, Deficit, 100, crores, Municipal corporation, kolhapur