Sat, Feb 29, 2020 12:37होमपेज › Kolhapur › ‘दौलत’च्या साखरेवर पावसाचे संकट

‘दौलत’च्या साखरेवर पावसाचे संकट

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 12:23AMचंदगड :नारायण गडकरी 

हलकर्णी येथील दौलत साखर कारखान्याची ‘बुडत्याचा पाय खोलात,’ अशी स्थिती झाली आहे. शेतकरी आणि कामगारांची बिले थकीत राहिल्याने ‘दौलत’च्या गोडाऊनमधील साखर 18 महिने झाले तरी बाहेर काढण्यात जिल्हा बँकेला यश आले नाही. जिल्हा बँकेने तारणावर घेतलेली 43,922 क्विंटल साखर शेतकरी व कामगारांच्या बिलासाठी गोदामात पडून राहिली आहे. चंदगड तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असते. चालू महिन्यात गोडाऊनमध्ये साखर शिल्लक राहिली, तर संपूर्ण साखर खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

2015-16 चा गळीत हंगाम गोकाकच्या न्यूट्रियन्स कंपनीने घेतला. या कंपनीने 45 वर्षांच्या करारावर कारखाना चालवण्यास घेतला आहे. केवळ एक हंगाम घेतल्यानंतर कारखान्याला पुन्हा अवकाळा आली. कामगारांचे थकीत पगार व शेतकर्‍यांची थकीत ऊस बिले यावरून कंपनी आणि कामगारांमध्ये वाद निर्माण झाले. काही कामगारांना यामधून ले-आऊटच्या नोटिसा देण्यात आल्या. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. सन 2017-18 चा गळीत हंगाम कंपनीने घेतला नाही. तेव्हापासून आजअखेर उत्पादित झालेली साखर गोडाऊनमध्ये पडून राहिली आहे. कंपनीने अनेकवेळा साखर चोरी केली. साखर चोरी प्रकरण उघडकीस आले. ते प्रकरणही अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यानंतर आपल्या थकीत कर्जासाठी जिल्हा बँकेनेही साखर विक्री करण्याचा अनेकवेळा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. 

गोडाऊनवरचे पत्रे फुटले आहेत. त्यामुळे मोठा पाऊस झाल्यानंतर संपूर्ण साखर भिजण्याची शक्यता आहे. तसेच भिंतीही ओल्या झाल्या आहेत. गोडाऊनमधील संपूर्ण वातावरण मॉईश्‍चर झाले आहे. चार-आठ दिवसात साखर बाहेर काढली, तरच अधिक होणारे नुकसान टळणार आहे. त्यासाठी जिल्हा बँकेचे प्रयत्न सुरू आहेत. 30 जून रोजी न्यूट्रियन्स कंपनीचा करार जिल्हा बँकेचे हप्ते थकवल्याच्या कारणावरून संपुष्टात येणार होता.

बँकेने याबाबतचा कोणता निर्णय घेतला, हे शेतकर्‍यांना समजले नाही. ‘दौलत’ बंद असल्याचा गैरफायदा इतर कारखान्यांनी घेतला आहे. शेतकर्‍यांची सात कोटी रुपये ऊस बिले गेल्या दीड वर्षापासून ‘दौलत’ने थकवली आहेत. कामगारांच्या वेतनाची थकबाकी काही कोटींच्या घरात गेली आहे. तसेच तोडणी-वाहतूकदारांचीही बिले अडकून पडली आहेत. जिल्हा बँकेने तारणावर घेतलेली 43,922 हजार क्विंटल साखर शेतकरी व कामगारांच्या बिलासाठी गोदामात पडून राहिली आहे. तसेच सन 2010-11 च्या गळीत हंगामात तासगावकर कंपनीने कारखाना चालवण्यासाठी घेतलेला होता. त्यावेळचीही ऊस बिले थकीत आहेत. जिल्हा बँकेकडे न्यूट्रियन्स कंपनीने 34 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. 

शेतकर्‍यांची सात कोटी ऊस बिले, दहा कोटी कामगारांचा पगार आणि पाच कोटी तोडणी-वाहतूकदारांची बिले असे सुमारे 22 कोटी रुपये देण्याची अट असताना जिल्हा बँकेने करार रद्द करण्याच्या हालचाली गतिमान केल्याचे समजते.  शेतकर्‍यांची ‘दौलत’ पुन्हा दिमाखात सुरू होणार की नाही, याबाबत सध्यातरी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.