होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात २७६ ठिकाणी डेंग्यू डासांच्या अळ्या

कोल्हापुरात २७६ ठिकाणी डेंग्यू डासांच्या अळ्या

Published On: Dec 02 2017 1:08AM | Last Updated: Dec 02 2017 12:45AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर महापालिकेच्या पाच पथकांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी डेंग्यू निर्मूलनासाठी शुक्रवारी तपासणी मोहीम राबविण्यात आली. शहरातील अडीच हजारांवर घरातील सुमारे 13 हजार 587 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात सर्दी-ताप आलेल्या 35 रुग्णांचा समावेश असून त्यापैकी 9 संशयित रुग्णांच्या रक्‍ताचे नमुने घेण्यात आले. 6 हजार 40 पाणी साठवणुकीचे ड्रम, कंटेनरची पाहणी केली असात 276 दूषित निघाले. त्यात डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्याने औषध टाकून नष्ट करण्यात आल्या. परिसरात औषध फवारणी व धूर फवारणी करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.   

महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात डेंग्यू सर्वेक्षण मोहीम गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहे. जवाहरनगर, मंगेशकरनगर, शुक्रवार पेठ, जुना बुधवार पेठ, सदरबाजार, कनाननगर, टेंबलाईनाका, महाडिक माळ, शिवाजी पेठ व सी.पी.आर. कॅम्पस या भागात प्राधान्याने युद्धपातळीवर डेंग्यू सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत पथक नियंत्रण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, ए.एन.एम., जी.एन.एम.कर्मचारी, आशा स्वयंसेविका, कीटकनाशक विभागाकडील कर्मचारी तसेच, आरोग्य स्वच्छता विभागाकडील कर्मचारी  यांचा समावेश आहे.

डेंग्यू मुक्‍त कोल्हापूर या उद्देशाने राबविण्यात येणार असून आपल्या भागामध्ये येणार्‍या आरोग्य विभागाकडील अधिकारी व कर्मचार्‍यांना योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यधिकारी डॉ. अरुण वाडेकर यांनी केले आहे. दरम्यान, नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. पाणी झाकून ठेवावे. परिसर स्वच्छ ठेवावा. टायर व इतर टाकाऊ वस्तू नष्ट करावेत. पाणी साठून राहू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे.