Sun, Sep 20, 2020 06:18होमपेज › Kolhapur › डीवायएसपी आर. आर. पाटील यांना दुसर्‍यांदा राष्ट्रपती पदक

डीवायएसपी आर. आर. पाटील यांना दुसर्‍यांदा राष्ट्रपती पदक

Published On: Aug 15 2019 1:20AM | Last Updated: Aug 15 2019 12:37AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

पोलिस दलातील गौरवास्पद कामगिरीची दखल घेऊन ‘शाहूवाडी’चे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक व पिंपरी-चिंचवड येथील सहायक पोलिस आयुक्‍त आर. आर. पाटील यांना बुधवारी राष्ट्रपती पदक जाहीर झाले. पाटील यांना यापूर्वी 2006 मध्येही राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते. गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल 32 वर्षांच्या काळात दुसर्‍यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने  पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून 1987 मध्ये पोलिस दलात उपनिरीक्षकपदावर दाखल झालेले आर. आर. पाटील यांनी आजवरच्या सेवाकाळात 642 बक्षिसे संपादन केली आहेत. राष्ट्रपती पदकासह पोलिस महासंचालकाचे सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. आजवर मुंबई, कोडोली, जयसिंगपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखा, शाहूवाडी पोलिस उपअधीक्षक म्हणूनही त्यांनी उल्‍लेखनिय  कामगिरी बजावली आहे. पाटील हे पिंपरी-चिंचवड येथे क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्‍तपदी कार्यरत आहेत.

पाटील यांनी कळे (ता. पन्हाळा) येथील यशवंत सहकारी बँकेमध्ये झालेल्या 75 लाख 35 हजार रुपयांच्या चोरीचा छडा लावून संशयितांना अटक केली होती. मिरची व्यापारी अपहरण, लुटमारीसह जाखले (ता. पन्हाळा) येथील बहुचर्चित खुनाचा छडा लावून मारेकर्‍यांना अटक केली होती. कोल्हापूर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पाटील यांनी विविध उपक्रम राबविले होते.

दिवंगत नेते माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे ते कनिष्ठ बंधू होत. पाटील यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, श्रीनिवास घाडगे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत आदींनी त्यांचे अभिनंदन केले.