Sat, Feb 29, 2020 17:20होमपेज › Kolhapur › ‘हत्ती’एवढे नुकसान, ‘चिलटा’एवढी भरपाई!

‘हत्ती’एवढे नुकसान, ‘चिलटा’एवढी भरपाई!

Published On: Apr 07 2018 2:00AM | Last Updated: Apr 07 2018 12:42AM
कोल्हापूर : सुनील कदम

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कर्नाटकातून आलेल्या जंगली हत्तींनी जर शेतकर्‍यांच्या मालमत्तेचे नुकसान केले, तर संबंधितांना पाच ते दहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, हत्तींमुळे होत असलेल्या विध्वंसाचे प्रमाण विचारात घेता ही मदत म्हणजे ‘हत्ती’एवढे नुकसान आणि ‘चिलटा’एवढी भरपाई, असे म्हणावे लागेल. कारण, आजपर्यंत यामुळे झालेले नुकसान अपरिमित स्वरूपाचे आहे आणि भविष्यातही ते होत राहण्याचा धोका कायम आहे.

जिल्ह्यातील चंदगड, भुदरगड, आजरा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांमध्ये साधारणत: 2002 सालापासून कर्नाटकातून आलेल्या जंगली हत्तींचा उपद्रव सुरू झालेला आहे. चंदगडपासून दोडामार्गपर्यंतच्या जंगलाला या हत्तींनी आता आपला कायमस्वरूपी अधिवास बनविल्याचे स्पष्ट झालेले आहे. 

या जंगली हत्तींचा आणि या परिसरातील शेतकर्‍यांचा संघर्षही जुनाच आहे. या संघर्षात आतापर्यंत जवळपास 20 लोकांचा बळी गेला आहे आणि या काळात राबविल्या गेलेल्या हत्ती हटाव मोहिमेदरम्यान दोन हत्तींचाही जीव गेलेला आहे. या काळात हत्तींनी केलेल्या शेतीचे आणि अन्य प्रकारचे नुकसान हे काही कोटीत मोजावे लागेल, एवढे प्रचंड आहे. त्या-त्यावेळी संबंधित शेतकर्‍यांना राज्य शासनाकडून शेतीच्या नुकसानीच्या काही प्रमाणात नुकसानभरपाई मिळत आलेली आहे. मात्र, झालेले नुकसान आणि मिळणारी भरपाई यांचे प्रमाण नेहमीच उणे स्वरूपाचे असल्याचे बघायला मिळते.
 

Tags : kolhapur district, radhangari, elephants