Fri, May 07, 2021 18:02
गोकुळ निवडणूक : विरोधकांची ९, तर सत्ताधाऱ्यांची ७ जागांवर आघाडी

Last Updated: May 04 2021 3:35PM

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

गोकुळच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी गटातील उमेदवारांची मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये सत्ताधारी गटाच्या ७ तर विरोधी आघाडीच्या ९ जागा आघाडीवर आहेत. मतमोजणी जसजशी पुढे सरकेल तशी क्रॉस व्होटिंगमुळे दोन्ही गटांची धाकधूक वाढली आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधी आघाडीने सत्ताधारी गटाची काळजी वाढविली आहे. राखीव गटात सर्वच जागांवर निर्णायक मते घेऊन विजय मिळविल्यानंतर सर्वसाधारण गटात काय होणार याची धाकधूक लागली आहे. 

गोकुळच्या राखीव गटात सतेज पाटील गटाने बाजी मारल्यानंतर आता सर्वसाधारण गटाची मतमोजणी सुरू झाली आहे. १६ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात असून पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. क्रॉस व्होटिंग होत असल्याचे दिसून येत आहे. ५० मतपत्रिकांमागे २५ मते ही क्रॉस व्होटिंगची तर २५ मते पॅनेल टू पॅनेल असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जयपराजयाचे पारडे दोलायमान होण्याची शक्यता आहे. परिणामी निकालालाही अपेक्षेपेक्षा दोन तास उशिर लागण्याची चिन्हे आहेत. 

राखीव गटातील विजयाने पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधी आघाडीने सत्ताधारी गटाची काळजी वाढविली आहे. राखीव गटात सर्वच जागांवर निर्णायक मते घेऊन विजय मिळविल्यानंतर सर्वसाधारण गटात काय होणार याची धाकधूक लागली आहे. 

महिला गटात शौमिका महाडिक यांनी ४६ मतांनी विजय मिळविला आहे. त्याविरोधात विरोधी आघाडीने प्रथम फेरमतमोजणी मागण्याची तयारी केली मात्र, नंतर त्याबाबत निर्णय झाला नाही.  गेल्या तीन निवडणुकांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्यातील गोकुळमधील संघर्ष तीव्र झाला आहे. मागील निवडणुकीत पालमंत्री पाटील यांनी निवडणुकीत चांगलीच लढत दिली. परंतु त्यांना तीन जागांवरच मिळविता आला होता. त्यातही माजी आमदार संजय घाटगे यांचे पुत्र अंबरिश घाटगे हे कालांतराने सत्ताधारी गटात गेले. त्यामुळे फारसा प्रभाव दिसला नाही. मल्टिस्टेटच्या मुद्द्यावरूनही विरोधकांनी कोंडी केली होती. 

आज झालेल्या मतमोजणीत राखीव गटातील तीन पुरुष आणि दोन महिलांनी लक्षवेधी मते घेतली. आमदार सुजित मिणचेकर, अमरसिंग पाटील आणि बयाजी शेळके यांनी बाजी मारत विजयावर शिक्कामोर्तब करत विरोधी आघाडीचे खाते खोलले आहे. महिला गटात अंजना रेडेकर यांनी विजय मिळविला तर शेवटच्या टप्प्यात सत्ताधारी गटाच्या शौमिका महाडिक यांनी ४६ मतांनी बाजी मारली. 

सत्तारुढ पॅनेलच्या सर्वसाधारण गटात  रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील, अंबरिश घाटगे, चेतन नरके, सदानंद हत्तरकी, धनाजीराव देसाई, रविश पाटील-कौलवकर प्रताप पाटील, प्रकाश चव्हाण, राजाराम भाटळे, रणजित बाजीराव पाटील यांचा समावेश आहे. 

विरोधी पॅनेलमध्ये माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शशिकांत पाटील-चुयेकर, एस. आर. पाटील,  प्रकाश रामचंद्र पाटील, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, नाविद मुश्रीफ, वीरेंद्र मंडलिक, रणजित  कृ. पाटील अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेंगे, प्रा. किसन चौगुले,  बाबासाहेब चौगुले, विद्याधर गुरंबे, महाबळेश्वर चौगुले यांचा समावेश आहे.