Fri, Oct 30, 2020 04:28होमपेज › Kolhapur › कोरोना : तीन महिने उशिरा व्याज भरणाऱ्या कर्जदारांना दंडव्याज नाही

कोरोना : तीन महिने उशिरा व्याज भरणाऱ्या कर्जदारांना दंडव्याज नाही

Last Updated: Mar 28 2020 4:31PM
कर्नाड्स बँकिंग फाऊंडेशनचे किरण कर्नाड यांची खंत

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

रिझर्व्ह बँकेचे वार्षिक पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कोरोना व्हायरसच्या गंभीर परिस्थितीवर काही चांगले परिणामकारक उपाय जाहीर केले असल्याचे बँकिंग तज्ज्ञ आणि कर्नाड्स बँकींग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे संचालक किरण यांनी सांगितले.

नेहमी एप्रिलमध्ये जाहीर होणारे रिझर्व्ह बँकेचे वार्षिक पतधोरण कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे २७ मार्चलाच जाहीर केले गेले, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना किरण कर्नाड म्हणाले की,' या पतधोरणामुळे रिझर्व्ह बँकेने आपला बँक रेट कमी केला असून रेपो रेट ०.७५ बेसीसने कमी करुन तो पूर्वीच्या ५.१५ % वरुन ४.१४% पर्यंत खाली आणला आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतलेल्या बँकाना आता रिझर्व्ह बँकेला कमी व्याज द्यावे लागेल. या संकटकाळात त्यांची नफा क्षमताही वाढेल. रेपो रेट कमी झाल्याचा परिणाम या बँकानी आपल्या कर्जदाराना दिलेल्या कर्जावरही होवू शकतो. 

या बँकाही आपल्या कर्जावरील व्याजदर आता कमी करतील. त्यामुळे बँकांच्या सामान्य कर्जदारांना दिलासा मिळेल. अर्थात कर्जदारांनी द्यावयचा 'ईएमआय' म्हणजेच कर्ज हप्ता आता कमी होऊ शकेल. या पतधोरणात रिव्हर्स रेपो रेटचा व्याजदरही ०.९० बेसीसने कमी होवून तो ४ %वर आल्याने रिझर्व्ह बँकेत ठेवी ठेवणाऱ्या सदस्य बँकाना कमी व्याज मिळेल. 

कर्नाड म्हणाले,' कोविड १९ चे संकट कमी करण्यासाठी बँकानी मुदत बंद कर्जावरील तीन महिन्यानंतर भराव्या लागणाऱ्या व्याजाला काहीशी स्थगिती दिलेली आहे. या टर्म लोनवरील हे व्याज भरण्यासाठी तीन महिन्यात भरावे लागते. पण यात सूट दिली गेली असून तीन महिन्याची मुदत संपल्यानंतरही आणखी तीन महिने वाढ देण्यात आलेली आहे. ही स्थगिती म्हणजे व्याज मुक्ती नव्हे, हे ही शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. मूळ म्हणजे हे तीन महिने उशिरा व्याज भरणारे कर्जदार थकबाकीदार या नावाने गणले जाणार नाहीत. शिवाय त्यांच्याकडून दंडव्याजही (finncial penalty) घेतले जाणार नाही, असे कर्नाड म्हणाले.

कर्नाड पुढे म्हणाले,' बाजारात अधिक पैसा येण्यासाठी बँकानी राखावयाच्या राखीव रोखता दरात (CRR) ही बदल केला असून तो पूर्वी असलेला रोखता दर १०० बेसीसने कमी करुन निव्वळ कर्ज मागणी आणि देयचेच्या ३%करण्यात आला आहे. यामुळे बँकांकडे आता कर्ज देण्यासाठी ज्यादा आणि मुबलक पैसा उपलब्ध होवू शकेल. 

कर्जदारांना कर्ज दिल्यानंतर उद्योगात स्थिर होण्यासाठी काही ठराविक कालावधी वसुली स्थगिती (रिपेमेंट हॉलीडे) दिली जाते. याला मोरटरीयम म्हणतात. या मोरटरीयम बाबतही शक्तीकांत दास यांनी मोठी सूट दिल्याचे किरण कर्नाड यांनी सांगितले. काही मुदत कर्जांना हा मोरटरीयम पूर्वी केवळ एक महिना होता. तो कर्जदारांना दिलासा देण्यासाठी आता किमान तीन महिन्यापर्यंत वाढविण्यास सांगितले असल्याचे किरण कर्नाड यांनी सांगितले. 

रोखपत वा कॅशक्रेडीट कर्जाबाबत या नव्या परिस्थितीत उचल मर्यादा (drawing power) पुन्हा एकदा निश्चित (recslculate) करण्याची विनंती शक्तिकांत दास यांनी बँकाना केल्याची माहिती यावेळी कर्नाड यांनी दिली.

कर्नाड म्हणाले, 'यावेळी अशा लवकर झालेल्या निर्णयांमुळे बँकेच्या ग्राहकांनी अजिबात घाबरुन जाण्याचे कारण नसून त्यांच्या सर्व बँकांमधील ठेवी सुरक्षित आहेत. कर्नाड म्हणाले, 'रिझर्व्ह बँकेचे हे धोरण म्हणजे व्याजमुक्ती वा कर्ज माफी नसून केवळ वसुलीला स्थगिती..तात्पुरता दिलासा आहे. कर्जाचा एनपीएचा कालावधी ९० दिवसांवरुन १८० दिवस करण्याची तसेच FSWMB ची व्याख्या बदलण्याची अटकळ होती. पण, या पतधोरणात ते पूर्णतः फोल ठरले. शक्तीकांत दास हे एकटे धोरण ठरवित नसून तज्ज्ञांची MPC म्हणजे पतधोरण समिती हे धोरण ठरवित असल्याने हे असे झाले असावे, असे कर्नाड म्हणाले. रिझर्व्ह बँकेचे हे पतधोरण म्हणजे बँकांवर बंधन नसून कोणता निर्णय घ्यायचा, हे सर्वस्वी वैयक्तिक बँकांवर अवलंबून असल्याचे कर्नाड यांनी सांगितले.

 "