Thu, Aug 13, 2020 17:46होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचा विचार न घेता कोरोनाची उपकरणे लादण्याचा घाट

कोल्हापूर : ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचा विचार न घेता कोरोनाची उपकरणे लादण्याचा घाट

Last Updated: Jun 05 2020 12:21PM

संग्रहित छायाचित्रगारगोटी (कोल्हापूर) : रविराज वि. पाटील

कोरोना महामारीच्या प्रतिबंधात्मक उपायोजना करून ग्रामपंचायतींच्या तिजोरीवर खडखडाट झाला असताना ५० वर्षावरील गावातील नागरिकांना संशमनी वटी व इतरही काही उपकरणे देण्याचा घाट घातला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना विश्‍वासात न घेता हजारो रुपयांचा भुर्दंड ग्रामपंचायतीना घातला जात असल्याची चर्चा पदाधिकार्‍यात सुरू आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध नियंत्रणात्मक उपाययोजना ग्रामपंचायतींच्या वतीने गावा-गावात राबविल्या आहेत. गाव निर्जंतुकीकरण करणे, नागरिकांना मास्क, अर्सेनीक अल्बम-30, सॅनीटायझर वाटप, संस्थात्मक क्वॉरंटाइन केल्या जाणार्‍या नागरीकांसाठी शाळांची रंगरंगोटी, दुरुस्ती, लाईट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासाठी ग्रामपंचायतीकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला आहे. काही ग्रामपंचायतींनी तरी उसनवारी करून उपाययोजना व नियंत्रणासाठी हजारो रूपयांचा निधी खर्च केला आहे. त्यामुळे हे पैसे भागवायचे कसे याची विवंचना ग्रामसेवक व पदाधिकार्‍यांना लागली असताना ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोग, स्वनिधी किंवा लोकसहभागातून संशमनी वाटप व इतर उपकरणे लदण्याचा घाट वरीष्ठ पातळीवर घातला जात आहे. 

वाचा : मुरगुडातील पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाची चाचणी आली निगेटिव्ह

पुण्यातील एका कंपनीमार्फत संशमनी वटी पॅकेट पंचायत समिती ग्रामपंचायत विभागाकडे पाठविण्यात आले आहे. पंचायत समितीमधून ते ग्रामसेवकांकडे सुपुर्द करण्यात आले आहे. संशमनी वटी मिळाल्यानंतर ग्रामसेवकांनी धनादेश गटविकास अधिकार्‍यांकडे जमा करून सबंधीत कंपनीला देण्याचे सूचित केले आहे. आशा सेविकामार्फत या गोळ्या वाटप करण्याच्या तोंडी सूचना दिल्या जात आहेत. मात्र या गोळ्यांचे वाटप करताना त्या वाटण्यासाठी कोणतेही पाकीट अथवा पिशवी दिलेली नाही. 

वाचा : देशात अनलॉक होत असतानाच कोरोनाचा उद्रेक सुरुच

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावा-गावात काही समाजसेवकांनी अर्सेनीक अल्बम-30 चेही मोफत वाटप केले आहे. पुन्हा संशमनी वाटप करून याचे पैसे कसे भागावायचे असा प्रश्‍न तिजोरीत खडखडाट झालेल्या ग्रामपंचायतींना पडला असून संशमनी वटी तसेच इतर उपकरणे वरिष्ठांकडून लादली जाऊ नयेत. ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेऊनच कोरोना प्रतिबंधात्मक उपकरणे खरेदी करावीत अशा प्रतिक्रिया ग्रामपंचायत पदाधिकार्‍यामधून व्यक्त केल्या जात आहेत.

संशमनी वटीच्या खरेदीसाठी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना विश्‍वासात न घेता परस्पर खरेदी करून त्या ग्रामसेवकामार्फत गावा-गावात पाठविल्या जात आहेत. इतरही काही उपकरणे घेण्याचा घाट वरीष्ठांकडून घातला जात आहे. याचा आर्थिक भुर्दंड ग्रामपंचायतीना परवडणारा नाही. 
- धनाजीराव खोत (अध्यक्ष - सरपंच संघटना)