Mon, Mar 08, 2021 17:13होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा नवा उच्चांक; 1,316 बाधित

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा नवा उच्चांक; 1,316 बाधित

Last Updated: Sep 10 2020 8:25AM

संग्रहीत छायाचित्रकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: कहर केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर सहा महिन्यांनी प्रथमच आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह बुधवारी आढळून आले. आज दिवसभरात 1,316 कोरोनाबाधित असल्याची नोंद करण्यात आली. एक हजारपेक्षा जास्त बाधित असल्याचा नवा उच्चांक नोंदविला गेल्याने कोल्हापुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नव्या रुग्णवाढीने जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 32,008 झाली आहे. गेल्या चोवीस तासांत 24 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले.

जिल्ह्यात एकूण मृत्यूंची संख्या 977 झाली आहे. जिल्ह्यात बरे होणार्‍यांच्या संख्येनेही आज 20 हजारांचा टप्पा पार केला आहे.कोल्हापुरातील 44 वर्षीय तरुण रायडरचा कोरोनाने खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांना श्‍वसनाचा त्रास होत असल्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात 1 हजार 14 कोरोनाग्रस्तांची भर पडली.

यापैकी 739 रुग्ण आज दिवसभरातील आहेत. आरटी-पीसीआर आणि सीबीएनएएटी  चाचणीचे 2 हजार 740 अहवाल प्राप्‍त झाले. त्यापैकी 437 अहवाल पॉझिटिव्ह आले. यापैकी एका रुग्णाचा अहवाल दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह आला, तर 66 जणांचे अहवाल नाकारण्यात आले आहेत. अँटिजेन चाचण्यांचे 609 अहवाल प्राप्‍त झाले, त्यापैकी 156 अहवाल पॉझिटिव्ह आले. निगेटिव्ह आलेल्या 453 अहवालांपैकी लक्षणे असलेल्या 122 जणांचे अहवाल पुन्हा आरटी-पीसीआर तपासणीसाठी पाठविण्यात आले. खासगी रुग्णालय तसेच लॅबमधील 421 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्‍त झालेल्या अहवालातील 1,014 बाधित रुग्णांपैकी आजरा तालुक्यात 12, भुदरगड तालुक्यात 25, चंदगडमध्ये 10, गडहिंग्लजमध्ये 13, गगनबावड्यात 1, हातकणंगलेत 117, कागलमध्ये 13, करवीरमध्ये 132, पन्हाळ्यात 34, राधानगरीत 32, शाहूवाडीत 29, तर शिरोळ तालुक्यात 42 रुग्ण आढळले आहेत. इचलकरंजीसह अन्य नगरपालिका क्षेत्रात 115 रुग्ण आढळले. सर्वाधिक 385 रुग्ण कोल्हापूर शहरात आढळून आले. आज आढळलेल्या रुग्णांपैकी अन्य जिल्ह्यातील 54 रुग्ण आहेत.

कोल्हापूर शहरातील रुग्णसंख्या दहा हजारांच्या टप्प्यावर

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आजही शहरात 385 इतके नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या 9 हजार 986 इतकी झाली आहे. गुरुवारी शहरातील बाधितांची संख्या दहा हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात 24 जणांचे मृत्यू

आज दिवसभरात जिल्ह्यात 24 जणांचे मृत्यू झाले. गौरव पाटील या 44 वर्षीय मोटारसायकल रायडरचा आज खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांना खोकला आणि ताप असा त्रास असल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. चांगली शरीरयष्टी अशी ओळख असलेल्या पाटील यांनी 1995-96 पासून कायनेटिक रायडर म्हणून सुरुवात केली होती. देशभरातील विविध स्पर्धा त्यांनी गाजवल्या होत्या. 2017 ला त्यांनी गोव्यात रायडर मेनिया स्पर्धेत ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’चा किताब पटकावला होता. त्यांची मुलगीही रायडर असून, मंगळवारीच तिची एका कंपनीसाठी निवड झाली आहे.

मृत्यू दर 3 टक्क्यांवर कायम

जिल्ह्याचा मृत्यू दर गेल्या काही दिवसांपासून तीन टक्क्यांवरच आहे. बुधवारीही जिल्ह्यात 24 मृत्यू झाले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 977 इतकी झाली आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर बुधवारी 3.05 टक्के इतका होता.

दहा हजारांवर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (उपचार घेणारे) संख्येने आज दहा हजारांचा टप्पा ओलांडला. आजअखेर जिल्ह्यात 10 हजार 349 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी काहीजण घरी आणि हॉटेलमध्ये उपचार घेत आहेत. 

आजअखेर 20 हजार 11 जण कोरोनामुक्‍त

जिल्ह्यात कोरोनातून पूर्ण बरे होणार्‍यांचे प्रमाण (रिकव्हरी रेट) वाढत चालले आहे. बुधवारी 686 जणांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले आहे. यामुळे कोरोनामुक्‍त झालेल्या एकूण संख्येने 20 हजारांचा टप्पा ओलांडला. आजअखेर 20 हजार 11 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले. व्हाईट आर्मीच्या दिगंबर जैन बोर्डिंग येथील कोरोना सेंटरमध्ये दाखल झालेल्या 103 वर्षांच्या आजीने कोरोनावर मात केली. आज तिला घरी सोडण्यात आले.

कोरोनाबाधित आढळून आलेले माजी खासदार राजू शेट्टी यांना श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी आज पुण्याला हलवण्यात आले. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीही मंगळवारी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात तपासणी करून घेतली. त्यांची प्रकृती चांगली असून, त्यांना विश्रांतीचा सल्‍ला देण्यात आला आहे. सध्या ते कोल्हापुरातील निवासस्थानी असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.