Tue, Jul 14, 2020 13:20होमपेज › Kolhapur › गडहिंग्लजमधील डॉक्टरला कोरोना; समूह संसर्गाचा धोका

गडहिंग्लजमधील डॉक्टरला कोरोना; समूह संसर्गाचा धोका

Last Updated: Jul 01 2020 1:05AM
गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा

गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाला थोपवून धरणार्‍या गडहिंग्लज शहराला मंगळवारी मोठा धक्‍का बसला. शहरातील पहिला रुग्ण डॉक्टरच बनले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचे धाबे दणाणले आहेत. हे डॉक्टर दररोज किमान 40 ते 50 रुग्ण तपासत होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईपर्यंत ते रुग्णच तपासत होते. त्यामुळे समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. 

राजेंद्र प्रसाद रोडवर असलेल्या या डॉक्टरांकडे दररोज किमान 40 ते 50 रुग्ण असतात. अलीकडच्या आठ दिवसांत रुग्णाचे प्रमाण वाढले होते. दोन दिवसांपूर्वी या डॉक्टरांची तब्बेत बिघडली होती. त्यांनी दोन दिवस विश्रांती घेऊन पुन्हा दवाखाना सुरू केला होता. मात्र, कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांनी तातडीने स्वॅब तपासणीसाठी दिले होते. अहवाल येईपर्यंत त्यांच्याकडे रुग्ण तपासणी सुरू होती. मंगळवारी रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.

गेल्या आठ दिवसांत त्यांच्याकडे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांचे यामुळे चांगले धाबे दणाणले असून, ही संख्या 300 च्या वर आहे. याशिवाय डॉक्टर व त्यांच्या पत्नी हे दोघेही अन्यत्र संपर्कात आल्याचेही समजते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या डॉक्टरांची ट्रॅव्हल हिस्ट्री लोकलच असून त्यांच्या संपर्कातील यादी मात्र मोठी आहे. या सर्वांची यादी करण्याचे काम सुरू असून हा परिसर सील करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

भादवण येथील डॉक्टर पत्नी बाधित

आजरा : तालुक्यातील भादवण येथील 68 वर्षीय डॉक्टर पत्नीला कोरोनाची लागण  झाल्याचे खासगी तपासणीत स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 79 झाली आहे.  या महिला डॉक्टरकडून गेल्या 15 दिवसांपासून परिसरातील रुग्णांना सेवा दिली जात होती. त्यांना  त्रास जाणवू लागल्याने त्यांनी  तपासणी करून घेतली होती. डॉक्टर पतीचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी  दोघांनाही सीपीआर येथे  हलविण्यात आल्याचे समजते.

गडहिंग्लज 5 जुलैपर्यंत बंद

नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी समूह संसर्ग टाळण्यासाठी  1 ते 5 जुलै गडहिंग्लज शहर पूर्णतः लॉकडाऊन  जाहीर केले आहे. केवळ दूध व औषध दुकाने सूरू राहणार आहेत.