Tue, Sep 22, 2020 00:56होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या विकासासाठी दाता समन्वयकाची गरज

कोल्हापूरच्या विकासासाठी दाता समन्वयकाची गरज

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 18 2018 10:52PMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

राष्ट्रीय महामार्गावर, दोन राज्यांच्या सीमेवर, दळण-वळणाच्या सर्व सुविधांनीयुक्‍त आणि समतोल नैसर्गिक अनुकुलता अशी उत्तम पार्श्‍वभूमी असलेल्या कोल्हापूरच्या विकासासाठी पुढाकार घेणारा एक समन्वय आवश्यक आहे. या समन्वयकाने देशातील आणि देशाबाहेरील विविध दातृत्त्ववान व्यक्‍ती वा संस्थांच्या हृदयाला साद घातली तर कोल्हापूरचे विकासाचे चित्र पालटू शकते. अर्थात यासाठी झपाटून पाठपुरावा करणार्‍या एका खंबीर समन्वयकाची गरज आहे.

कोल्हापूर हे ऐेतिहासिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परंपरा लाभलेले महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. इथे उद्यमशीलतेची गौरवशाली परंपरा आहे. साडेतीन शक्‍तिपीठांपैकी एक असलेली अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबा यांचे वास्तव्य आहे. पन्हाळगडापासून सामानगडापर्यंत गडकोट किल्ल्यांची भली मोठी रांग दक्षिणेची भिंत म्हणून उभी आहे. तसेच आंतरराष्ट्रीय शिल्पामध्ये समाविष्ट होण्याची ताकद असलेली खिद्रापूरसारखे लेणेही याच जिल्ह्यामध्ये आहे. दाजीपूरचे जंगल, राधानगरीचे धरण, अशी कितीतरी पर्यटनस्थळे पर्यटकांना साद घालतात. शिवाय, दुचाकीपासून थेट उपग्रहाला लागणार्‍या सुट्ट्या भागांची निर्मिती ही येथील उद्यमशीलतेची खरी ओळख आहे. इतके असूनही कोल्हापूर विकासाच्या महामार्गावर मात्र म्हणावे तसे धावत नाही. यासाठी शासकीय निधीची आवश्यकता तर आहेच; पण कोल्हापूरचे योग्य ब्रँडिंग झाले तर खासगी दानशूर व्यक्‍ती वा संस्थांकडून मोठा निधी उपलब्ध होऊन कोल्हापूरच्या विकासाला पंख फुटू शकतात.

काही वर्षांपूर्वी चेन्‍नईमधील एका गर्भश्रीमंताने कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे किरीट शिर्डीच्या साईबाबांना दान केले होते. धार्मिक स्थळांवर श्रद्धा असणार्‍या या व्यक्‍तीकडे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे तत्कालीन अध्यक्ष अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे यांनी संपर्क साधला होता. कदाचित समन्वयात अभाव राहिला असेल; पण घोरपडे यांनी मंगळूरच्या एस. एल. सेठ या सराफी व्यावसायिकाला योग्य दिशा देऊन देवीचे दर्शन घडविले आणि त्यांची श्रद्धा मंदिराच्या कामी आली. हे केवळ एक उदाहरण नाही. आंध्रातील रेड्डीज या उद्योग समूहाचे असेच कोल्हापूरशी भावनिक  संबंध जोडण्यात घोरपडे यांची शिष्टाई उपयोगाला आली होती. कालांतराने राजकारण बदलले आणि समन्वयकाची जागा मात्र रिक्‍त राहिली आहे.

गजानन महाराजांच्या शेगाव देवस्थान व्यवस्थापनाच्या कार्याने प्रभावित होऊन राव नामक एका दात्याने तब्बल 700 कोटी रुपयांचे दान देऊ केले होते. पण व्यवस्थापनाने यातील अवघे 70 कोटी रुपये स्वीकारून विकासाचे नंदनवन केले आणि सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे हे पैसेही त्यांनी कालांतराने व्याजासह दात्याला परत केले. इतका पारदर्शी कारभार आणि स्वच्छ प्रतिमा निर्माण केली, तर कोल्हापूरही विकासापासून इंचभरही दूर राहणार नाही.

देशभरात देणारे दाते असंख्य आहेत; पण घेणारे हात सक्षम हात मिळत नाहीत, ही दात्यांची व्यथा आहे. शिर्डीच्या साईबाबा देवस्थानने पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयात अत्याधुनिक कँटिन उपलब्ध केले. यातून गोरगरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना मोफत भोजनाची सोय उपलब्ध झाली. कोट्यवधी रुपयांचा हा प्रकल्प केवळ योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नामुळे यशस्वी झाला. असे प्रयत्न कोल्हापूरसाठी होण्याची गरज आहे. मात्र, यासाठी कोल्हापूर हे विकासाला विरोध करणारे शहर, सतत आंदोलनाचा झेंडा खांद्यावर मिरवणारे शहर अशी निर्माण होऊ घातलेली ओळख सर्वप्रथम पुसण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.