Tue, Jul 07, 2020 07:38होमपेज › Kolhapur › जलसंधारणच्या कामाला ठेकेदारांचा नकार

जलसंधारणच्या कामाला ठेकेदारांचा नकार

Published On: Jun 21 2018 1:36AM | Last Updated: Jun 20 2018 11:40PMकोल्हापूर : निवास चौगले

जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणार्‍या जलसंधारणाच्या कामाला निविदा भरूनही ठेकेदारांनी ही कामे करण्यास नकार दिला आहे. परिणामी, या कामांसाठी तरतूद केलेला कोट्यवधीचा निधी खर्च झालेला नाही. मेअखेरपर्यंत या निधीतून कामे करायची होती; पण शासनाचे दर परवडत नसल्याचे कारण पुढे करून ठेकेदारांनी कामांकडे पाठ फिरवली आहे. 

गेल्या साडेतीन वर्षांपासून पावसाचे पाणी अडवण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात योजना आखल्या जात आहेत. जलयुक्‍त शिवार अभियान, जलसंधारण आदी योजनांचा यात समावेश आहे. जलसंधारणाच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुके वगळता पन्हाळा, शाहूवाडी, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, चंदगड आदी तालुक्यांत या निधीतून कामे करण्यात येणार होती. 31 मे हा ही कामे पूर्ण करण्याचा अखेरचा दिवस होता; पण यापैकी भुदरगड,  व चंदगडमध्ये एकही काम झालेले नाही. उर्वरित तालुक्यांत काही कामे झाली आहेत; पण तरीही मोठ्या प्रमाणावर निधी अखर्चिक आहे. 

जलसंधारणमधून माती नाला बांध, मजगी, प्रवाही सिमेंट बंधारा, खोल चर, डीपीसी सिमेंट बंधारा आदी कामे करण्यात येणार होती. या कामांच्या निविदा निघाल्या, ठेकेदारांनी त्या भरल्याही; पण प्रत्यक्षात काम सुरू करायला ठेकेदारांनी नकार दिला आहे. शासनाने या कामांचे दर डिसेंबर 2017 मध्ये जे होते त्यात कपात केली आहे. त्याच दरम्यान या निविदा मागवण्यात आल्या होत्या. निविदा मंजूर झाल्या त्यावेळचा दर व आताचा दर यात मोठी तफावत आहे. सध्या असलेल्या दरात हे काम करणे परवडणारे नसल्याचे सांगत ठेकेदार कामावरच फिरकलेले नाहीत. जलयुक्‍त शिवार अभियानातील 54 कामे ठेकेदारांमुळे रखडली आहेत. 2017-18 या वर्षात जलयुक्‍तमधून 215 कामे करण्यात येणार होती. यापैकी 141 कामे पूर्ण झाली, तर 19 कामे सुरू आहेत.