Tue, Jun 15, 2021 11:13
ठेकेदारच बनले जिल्हा परिषद सदस्य!

Last Updated: Jun 11 2021 2:27AM

कोल्हापूर : विकास कांबळे

जिल्हा परिषद आणि त्यांची कामे करणारे ठेकेदार यांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा नव्या नाहीत. कामे मिळवण्यासाठी ठेकेदार कोणकोणते मार्ग अवलंबतात, याचीही आता बर्‍यापैकी सर्वसामान्यांना कल्पना आहे; मात्र अनेक ठेकेदारच जिल्हा परिषद सदस्य बनून दुसर्‍यांच्या नावाने कामे मिळवून करत असतील, तर त्या कामांचा दर्जा काय असेल? कामाचा दर्जा निकृष्ट असेल, तर त्यांना विचारणार कोण, असे प्रश्न आता समोर येत आहेत. 

राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध योजना गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचे काम जिल्हा परिषद करत असते. जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, गटारी, दिवाबत्ती, समाज मंदिर बांधणे आदी कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. या कामांसाठी निविदा काढून कंत्राटदार नेमले जातात. परंतु, अलीकडील काळात अनेक कंत्राटदारच जिल्हा परिषद सदस्य बनू लागले आहेत. जिल्हा परिषद सदस्य बनून ग्रामीण भागाचा विकास करण्यापेक्षा स्वहीत कसे जपले जाईल, याकडेच अशा सदस्यांचा कल असल्याचे उघड सत्य आहेत.  

जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्र, जनावरांचे दवाखाने, अंगणवाडी, शाळांचे बांधकाम केले जाते. ही कामे निविदा मागवूनच केली जातात. ही कामे आपल्यालाच मिळावीत, यासाठी ठेकेदार लोकप्रतिनिधींच्या मागे फिरत असतात. दहा लाखांच्या आतील सर्व कामे जिल्हा परिषद स्तरावर निविदा न काढता दिली जातात. त्यासाठी ठेकेदार जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य यांचे वजन वापरतो. त्यासाठी संबंधित ठेकेदारालादेखील आपले ‘वजन’ खर्च करावे  लागते. अलीकडील काळात निधी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने ग्रामीण भागातील ठेकेदारच जि. प. सदस्य बनू लागले आहेत. अशा सदस्यांची संख्या लक्षणीय आहे. 

जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्या ठेकेदारांना स्वत:च्या नावावर काम करता येत नाही. त्यामुळे दुसर्‍यांच्या नावावर ही मंडळी काम करू लागली आहेत. या कामांच्या दर्जाबाबत त्यांना विचारणार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. त्याच्या परिणाम कामाच्या दर्जावर होऊ लागला आहे. 

कामाच्या दर्जावरून बिल थांबविले, तर संबंधित अधिकार्‍यांशी वाद घातला जातो. प्रसंगी बघून घेण्याची भाषाही केली जाते. हे प्रकार गंभीर आहेत; पण तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न आहे.

सात ते आठ ठेकेदार अथवा त्यांच्या पत्नी सदस्य

जिल्हा परिषदेची कामे करणार्‍या ठेकेदारांपैकी यावेळेच्या सभागृहात किमान सात ते आठजण सदस्य म्हणून जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. त्यापैकी काही जण थेट आहेत, तर काहींनी आपल्या पत्नीला जिल्हा परिषद सदस्य केले आहे. यात करवीर, चंदगड, शाहूवाडी, शिरोळ, भुदरगड या तालुक्यांतील काही सदस्यांचा समावेश आहे.