Sat, Feb 29, 2020 18:40होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर उमेदवारीचा गुंता

कोल्हापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर उमेदवारीचा गुंता

Published On: Oct 01 2019 2:01AM | Last Updated: Oct 01 2019 1:31AM

संग्रहीत छायाचित्रकोल्हापूर : सतीश सरीकर

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे चार दिवस शिल्‍लक आहेत. तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर अद्याप शिक्‍कामोर्तब झालेले नाही. काँग्रेसने अन्य पयार्यच नसलेल्या ठिकाणी दोघांना उमेदवारी दिली आहे; पण बाकीच्या ठिकाणांचे उमेदवार गुलदस्त्यात आहेत. राष्ट्रवादीने तर एकाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला उमेदवारीचा गुंता सुटत नसल्याचेच चित्र आहे. परिणामी, इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले होते. यंदा मात्र भाजप-शिवसेनेला टक्‍कर देण्यासाठी आघाडी करण्याशिवाय दोन्ही पक्षांसमोर पर्याय नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होईल, असे दोन्ही पक्षांतील नेतेमंडळी ठामपणे सांगत आहेत; परंतु आघाडीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. काँग्रेसने कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात ऋतुराज पाटील व करवीरमध्ये पी. एन. पाटील यांना उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे. दरम्यान, शिवसेनेने दहापैकी आठ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करून बाजी मारली आहे. 

काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे प्रत्येकी दहाही विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मात्र आघाडी होणार असल्याने काँग्रेसला सहा तर राष्ट्रवादीला चार मतदारसंघ मिळण्याची शक्यता व्यक्‍त करण्यात येत आहे. काँग्रेसने कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, हातकणंगले, इचलकरंजी व शिरोळ या मतदारसंघावर दावा सांगितला आहे.  राष्ट्रवादीला कागल, चंदगड, राधानगरी व पन्हाळा-बावडा हे मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. 

इचलकरंजीतून राहूल खंजिरे, इचलकरंजी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नगरसेवक संजय कांबळे व नगरसेवक शशांक बावस्कर, अमृत भोसले इच्छुक आहेत. हातकणंगलेतून जिल्हा बँकेचे संचालक राजूबाबा आवळे, शिरोळमधून गणपतराव पाटील तर कोल्हापूर उत्तरमधून सागर चव्हाण व सचिन चव्हाण काँग्रेसकडून इच्छुक आहेत. राष्ट्रवादीतून कागलसाठी हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित आहे. चंदगडला गोकुळचे संचालक राजेश पाटील, राधानगरीतून के. पी. पाटील किंवा जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शाहुवाडीतून बाबासाहेब पाटील रिंगणात उतरू शकतात. उमेदवारी जाहीर न झाल्याने सर्वांची पंचाईत झाली आहे. राधानगरीतून के.पी.पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास ए.वाय. पाटील हे बंडखोरी करण्याची शक्यता आहे.

शिरोळ स्वाभिमानीला मिळण्याची शक्यता...

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सामावून घेण्यात येणार आहे. स्वाभिमानीने जिल्ह्यातील दहापैकी चार जागांची मागणी केली आहे; परंतु शिरोळ विधानसभा मतदारसंघ स्वाभिमानीचा बालेकिल्‍ला आहे. परिणामी, आघाडीअंतर्गत शिरोळ स्वाभिमानीला सोडण्याची शक्यता आहे. या  मतदारसंघातून माजी खासदार राजू शेट्टी यांनी लढावे, असा आग्रह असला तरी सावकर मादनाईक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे; मात्र हा मतदारसंघ स्वाभिमानीकडे गेला तरी राष्ट्रवादीतील इच्छुक राजेंद्र पाटील-यड्रावकर बंडखोरी करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे गणपतराव पाटील यांच्या भूमिकेकडेही लक्ष राहील.