Thu, Sep 24, 2020 17:09होमपेज › Kolhapur › आपत्ती व्यवस्थापन कायद्याद्वारे शिवाजी पुलाचे काम पूर्ण करा

आपत्ती व्यवस्थापन कायद्याद्वारे शिवाजी पुलाचे काम पूर्ण करा

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 21 2017 12:28AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाचे अर्धवट बांधकाम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेऊन पूर्ण करावे, अशी मागणी जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले. 

कालमर्यादा संपल्याने शिवाजी पूल धोकादायक बनला आहे. पर्याय म्हणून दुसरा नवीन पूल बांधण्यात येत आहे. स्व. खा. सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रयत्नांमुळे केंद्र सरकारकडून या पुलासाठी निधी मिळाला आहे. पुलाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असताना आता पुरातत्त्व खात्याच्या परवानगीसाठी गेली चार वर्षे काम बंद आहे. 

मानवी जीवितापेक्षा इतर कोणतीही बाब मोठी नसल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अशा कामांना जिल्हाधिकार्‍यांना असलेल्या अधिकारांचा वापर करून पुलाचे काम करण्यास आदेश द्यावेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये धोकादायक स्थितीत असणार्‍या वास्तू व जागांची पाहणी, निश्‍चितीकरण करणे, जीवितहानी होऊ शकते अशा धोकादायक वास्तू पाडणे, त्याला पर्यायी पूल बांधणे, लोकांची सोय करणे आदी कामे या कायद्याचा आधार घेऊन करण्याची तरतूद आहे.

या तरतुदीचा आधार घेऊन पुलाचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार इतकी वर्षे हा पर्याय का वापरला नाही, असा प्रस्ताव यापूर्वी का दिला नाही. अशा अधिकार्‍यांवर कारवाई करा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. असा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून नुकताच प्राप्‍त झाला आहे. कायदा विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला असून, त्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही सुभेदार यांनी दिली.

शिष्टमंडळात आर. के. पोवार, अशोक पोवार, दिलीप पवार, किशोर घाटगे, सुभाष देसाई, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, रामभाऊ कोळेकर, अशोक रामचंदाणी, अनिल घाडगे, बाबुराव कदम, नामदेव गावडे,  सतीशचंद्र कांबळे, वसंतराव मुळीक,  लालासाहेब गायकवाड यांचा सहभाग होता. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीचा शोध घेण्याचे काम विजय घाटगे आणि अजित सासणे यांनी केले.